लॉकडाऊनमध्येही सादर केले चमकदार ताळेबंद
मुंबई – लॉकडाऊनच्या काळातही विप्रो आणि इन्फोसिस कंपन्यांनी उत्तम कामगिरी करून चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठी वाढ झाली.
इन्फोसिस कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार या कंपनीला पहिल्या तिमाहीतील नफ्यात 12.4 टक्के वाढ झाली आणि कंपनीचा नफा 4,272 कोटी रुपयांवर गेला. आगामी वर्षातील महसूल दोन टक्क्यांनी वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अर्थातच इन्फोसिसच्या या ताळेबंदानंतर या कंपनीच्या शेअरचा भाव आज 10 टक्क्यांनी वाढला.
याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, सध्या अस्थिर परिस्थिती असूनही या दोन कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे भारतीय शेअर बाजारात उमेद आली आहे. लॉकडाऊनमुळे या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता या अगोदर व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या कंपन्यांनी विश्लेषकांचे हे अंदाज खोटे ठरविले. आगामी काळातही असेच काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी सांगितले.
विप्रो कंपनीला दुसऱ्या तिमाहीमध्ये 2,390 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव काल 17 टक्क्यांनी वाढला होता. गुरुवारी लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपनीच्या शेअरचा भावही तब्बल सात टक्क्यांनी वाढला.
शेअरबाजार निर्देशांक उसळले
माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे भारतीय शेअरबाजारात आज खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक सव्वा टक्क्यापर्यंत वाढले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 419 अंकांनी म्हणजे 1.16 टक्क्यांनी वाढून 36,471 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 121 अंकांनी वाढून 10,739 अंकावर बंद झाला.
महिंद्रा, नेस्ले, इंडसइंड बॅंक, कोटक बॅंक, ऍक्सिस बॅंक आज आघाडीवर हाती. चीनचा विकासदर 3.2 टक्क्यांवर जाऊनही चीनमधील शेअरबाजार निर्देशांक घसरले. मात्र, त्याचा परिणाम भारतीय निर्देशांकांवर झाला नाही. जागतिक बाजारात क्रुड तेलाचे दर 1.71 टक्क्यांनी कमी होऊन 43.48 डॉलर प्रति पिंप झाले. रुपयाचा दर तीन पैशांनी कमी होऊन 75.18 रुपये प्रति डॉलर झाला.