इमारत उंचीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार पुणे पालिकेला

संरक्षण विभागाकडून मान्यता : बांधकामांचा मार्ग मोकळा

पुणे – शहरातील बांधकामांच्या उंचीसंदर्भात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार संरक्षण विभागाने महापालिकेला दिले आहेत. महापालिकेने प्रमाणपत्र दिल्यानंतर आता संरक्षण विभागाच्या मान्यतेनंतर बांधकाम सुरू करता येणार आहे.

शहरातील बांधकामांच्या उंचीसंदर्भात हवाई दलाने तयार केलेल्या नकाशात असलेली तफावत दूर करण्यासाठी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. संरक्षण विभागाने लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील बांधकामांच्या उंचीवर निर्बंध आणले आहेत. या बांधकामांची उंची ठरविण्यासाठी “कलर कोडिंग’ केलेले “झोन’ तयार केले आहेत. त्यानुसारच बांधकामाला परवानगी दिली जात आहे.

या परवानगीसाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडून उंचीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होते. मात्र, या विभागाने पुरेशी यंत्रणा नसल्याने येथील कामकाज ठप्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला अधिकार देण्यात आले होते, मात्र या विभागाचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे प्रमाणपत्राअभावी बांधकामे ठप्प झाली आहेत. अखेर आता यासंबंधीचे प्रमाणपत्र महापालिकेलादेखील देता येणार आहे. त्यामुळे आता बांधकाम विभाग उंची संदर्भातील प्रमाणपत्र देणार आहे. यासंदर्भातले परिपत्रक महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी काढले आहे.पण, महापालिका प्रशासनाने प्रमाणपत्र दिल्यानंतर संरक्षण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावेच लागणार आहे.

आता अशी मिळेल परवानगी
नकाशामध्ये दर्शवलेल्या लाल “झोन’चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महापालिकेत वास्तूविशारद यांना प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. यामध्ये मिळकतीचे लॅटिट्यूट आणि लॉंगिट्यूड दर्शवण्यात यावे. महापालिकेच्या बांधकाम विकास विभागात सॅटलाईट चित्र रंगवण्यात आली आहेत. त्यानुसार गुलाबी “झोन’मध्ये येणाऱ्या मिळकतींची पडताळणी करण्यात येणार आहे. यानंतर बांधकाम विभाग मिळकतीची उंची मोजणार आहे. यासाठी “जीटीएस’ (ग्रेट ट्रिगोनामेट्रियल सर्व्हे) लेव्हलचे नकाशे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडे भारतीय सर्व्हेक्षण विभागाचे टोपोशिटचे अक्षांक्ष आणि रेखांशचे नकाशे आहेत. ज्या क्षेत्रावर बांधकामाची परवाणगी द्यायची आहे तिची “जीटीएस’ लेव्हल निश्‍चित करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने उंचीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर संरक्षण विभागाकडे हा प्रस्ताव जाईल, त्यांची परवाणगी मिळाल्यानंतर बांधकाम सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)