मद्यविक्रीतून दीड हजार कोटींचा महसूल जमा

पुणे – शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात मद्यविक्रीतून तब्बल 1 हजार 501 कोटी रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जमा झाला. याबरोबरच गेल्या वर्षभरात अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी 5 कोटी 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चालू आर्थिक वर्ष संपण्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या वर्षभराचा आढावा घेण्यात आला. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशी आणि विदेशी मद्यविक्रीचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा यंदा 210 कोटी रुपयांनी वाढले आहे. दरम्यान, अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात कारवाई केली. अवैध मद्य वाहतूक करणारी 187 वाहने जप्त केली. बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच, हातभट्टीचे प्रकारही शहरातून हद्दपार केले आहेत. परिणामी, देशी आणि विदेशी मद्यविक्रीचे प्रमाण वाढले आहे.

विभागाला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत 1 हजार 501 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी जानेवारीअखेर 1 हजार 291 कोटी रुपये महसूल मिळाला होता. बेकायदा मद्यविक्रीचे प्रकार रोखण्यासाठी छापा टाकणे, गस्त घालण्यात येत असते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 2 हजार 955 गुन्हे दाखल झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.