बायोबबलमुळेच परदेशी खेळाडूंची माघार

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा दावा

मुंबई  -करोनापेक्षा जास्त भीती बायोबबलचीच घेतल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतूनही अनेक परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे, असा दावा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला आहे.

करोनाच्या धोक्‍यामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा अमिरातीत खेळवली गेली होती. यंदा मात्र, ही स्पर्धा नेहमीप्रमाणे भारतातच होत आहे. मात्र, करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. परदेशी खेळाडू आपल्या स्वातंत्र्याबाबत खूपच आग्रही असतात. त्यांना बायोबबलमध्ये जास्त राहता येणार नाही कारण ती त्यांची मानसिकताही नाही. त्या उलट भारतीय खेळाडू बायोबबलच काय पण कोणत्याही वातावरणात राहू शकतात. मानसिकदृष्ट्‌या भारतीय खेळाडू परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त कणखर असतात, असेही गांगुली म्हणाले. आयपीएलच्या 14 व्या मोसमाला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. 

गतविजेता मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू या दोन संघात यंदा सलामीची लढत रंगणार आहे. भारतीय खेळाडू गतवर्षी सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या आयपीएलस्पर्धेपासून जवळपास सहा महिने बायोबबलमध्ये आहेत. त्या उलट परदेशी खेळाडूंना काही काळ विश्रांतीही मिळाली आहे. तरीही त्यांना बायोबबलमध्ये राहिल्यास आपले स्वातंत्र्य धोक्‍यात येइल अशी भीती वाटते त्यामुळेच करोनाच्या धोक्‍यामुळे नव्हे तर बायोबबलच्या दडपणामुळेच काही परदेशी खेळाडू या स्पर्धेतून माघार घेत आहेत, असेही गांगुली यांनी सांगितले.

गेल्या वर्षी अमिरातीत झालेली स्पर्धा असो किंवा यंदा भारतातच होत असलेली स्पर्धा असो परदेशी खेळाडूंनी याच कारणाने माघार घेतली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, भारताचे खेळाडू सातत्याने बायोबबलमध्ये राहात आहेत. भविष्यात दौऱ्याचे आयोजन करताना याचा विचार केला जावा, असे मत भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने काही दिवसांपूर्वी व्यक्‍त केले होते. कोहलीचा हा मुद्दा नक्कीच लक्षात ठेवण्यात येईल, असे आश्‍वासनही गांगुली यांनी दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.