वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय आता 62

पुणे – आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह राज्य कामगार विमा योजनेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता आणखी दोन वर्षे सेवेत राहण्याची संधी मिळणार असून, रिक्त जागांचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

आरोग्य सेवा संचालनालायतील महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा गट “अ’ मधील संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक; तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा तसेच कामगार विमा योजनेतील संचालक, उपसंचालक, वैद्यकीय अधीक्षक यांना वगळून उर्वरीत रुग्णालयात थेट सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन वर्षांच्या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.

दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा संचालनालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ’मधील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेषज्ञ संवर्गातील पदे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे, राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट “अ’मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षापर्यंत वाढविण्याचा सरकारने निर्णय यापूर्वीच घेतला आहे. हा निर्णय पुढील पाच वर्षांसाठी अर्थात 2023 पर्यंत लागू करण्यात आला आहे. राज्याच्या विविध सामाजिक संघटना, समाजसेवक, लोकप्रतिनिधींना डॉक्‍टरांच्या रिक्तपदाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच, सेवा निवृत्तीचे वय वाढण्याबाबत राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली होती. निवृत्तीमुळे रिक्त पदांमध्ये वाढ होऊन आरोग्यव्यवस्थेची दुरवस्था होऊ शकते. हे टाळण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.