फलटण मतदारसंघातील निकालाची उत्सुकता शिगेला

अंतिम मतदान 64.46 टक्के, पावसाने उघडीप दिल्याने मतदान गतीने
फलटण – फलटण (राखीव) विधानसभा मतदारसंघात काही अपवाद वगळता सर्व मतदान केद्रांवर शांततेत मतदान पार पडले. मतदान 64.47 टक्के झाले असून सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशीनबंद झाले आहे. मतदानात एकूण तीन लाख 31 हजार 685 मतदारांपैकी एकूण दोन लाख 13 हजार 790 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आता उत्सुकता निकालाची लागली असून कोण निवडून येणार, यावर पैजा लागल्या आहेत.

मतदानादिवशी सोमवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर महिला- पुरुष, युवकांच्या मतदानासाठी रांग लागल्याचे चित्र होते. दुपारी एक वाजेपर्यंत या मतदारसंघात 32 टक्के मतदान झाले होते. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे मतदारांची संख्या तुरळकच दिसत होती. सोमवारी सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती, परंतु ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदार दिसत होते.

महिलावर्ग व तरुण जास्त मोठ्या प्रमाणात हजर होते. त्याबरोबर बाहेरगावी नोकरीनिमित्त असणाऱ्या तरुणांनीही आपली हजेरी लावत उस्फूर्तपणे मतदान केले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर या नेत्यांनी फलटण शहरातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच महाआघाडीचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांनी तरडगाव येथे तर महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे यांनी गिरवी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 340 मतदान केंद्रासाठी एकूण एक हजार 837 कर्मचारी नेमण्यात आले होते. फलटण तालुक्‍यात 296 मतदान केंद्रे व कोरेगाव तालुक्‍यातील 44 मतदान केंद्रे होती. गत निवडणुकीत 2014 मध्ये तीन लाख सहा हजार204 पैकी दोन लाख 659 मतदारांनी मतदान केले होते. यावेळी तीन लाख 31 हजार 685 मतदानापैकी दोन लाख 13 हजार 790 मतदान होऊन याची सरासरी 64.46 टक्के झाली. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर चिखल व साचलेल्या पाण्याचा मतदारांना त्रास झाला.

मात्र याची दखल घेत या ठिकाणी मुरूम व पर्यायी व्यवस्था करण्यात आली. जिंती येथे मतदान केंद्रावर थोड्या उशिराने मतदान सुरू झाले, तर खुंटे येथे भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. दोन ते तीन ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. शहरात सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी फार कमी दिसत होती. त्या तुलनेत ग्रामीण भागातील तरडगाव, आसू, विडणी, साखरवाडी, गिरवी, आदर्की, दुधेबावी, सांगवी, बरड, गुणवरे या व अशा अनेक ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते.

शंभरी पार मतदारांचे आसूत मतदान

आसू येथील मतदान केंद्रांमधे श्रीमती अनुसया साधू जाधव (वय वर्षे 103) आणि राजाराम तुकाराम गाडी (वय वर्षे 105) यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आसू येथील मतदार जागरूक असून फलटण तालुक्‍यात राजकीयदृष्ट्‌या या गावाला अधिक महत्त्व आहे. सरकारने केलेल्या मतदानाच्या आव्हानाला येथील जनता नेहमीच प्रतिसाद देते.

Leave A Reply

Your email address will not be published.