पुणे – राज्य सीईटी सेलने एमएचटी-सीईटीचा जाहीर केलेल्या निकालात विद्यार्थ्याला मिळालेले “एकूण गुण’ आणि “रॅंक’चा उल्लेख नाही. केवळ पर्सेंटाईलद्वारे निकाल जाहीर केला. त्यामुळे आपल्यास नेमके किती गुण मिळाले, याचा अंदाज बांधता येणे कठीण होऊन बसले. या निकालावरून विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.
राज्य सीईटी सेलने यंदा प्रथमच पर्सेंटाईल पद्धतीने निकाल जाहीर केला. जेईई मेन्स परीक्षेच्या धर्तीवर हा निकाल जाहीर केला. मात्र, जेईईप्रमाणे विद्यार्थ्याला मिळालेले गुण आणि रॅंकचा उल्लेख केला नाही. विद्यार्थी व पालकांच्या हातात केवळ सीईटी-परीक्षेचे गुणपत्रक आहे. त्यात पर्सेंटाईल देण्यात आले आहेत.
दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल टक्केवारीत प्रसिध्द केला जातो. त्यामुळे 90 ते 95 टक्के गुण असणाऱ्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो, असा पालकांचा समज आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकालही पर्सेंटाईल पध्दतीने जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना एकूण गुण किंवा रॅंक याबाबत कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे 90 ते 95 टक्के
पर्सेंटाईल मिळालेल्यांनाही चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे पालकांना वाटत आहे. पण ते वास्तव नाही. प्रत्यक्षात 99.65 पर्सेंटाईलच्या आत गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार आहे. त्यामुळे 100 ते 99.65 पर्सेंटाईल मिळालेल्याच पुणे-मुंबई येथील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळेल. उर्वरित विद्यार्थ्यांना इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल.
सीईटीमध्ये 95.00 पर्सेंटाईल गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का? याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. प्रत्यक्षात 99.65 पर्सेंटाईलच्या आत गुण मिळालेल्या सुमारे 1 हजार विद्यार्थ्यांनाच नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. निकालात रॅंकिंग आणि एकूण मिळालेल्या गुणांचा उल्लेख असता तर गोंधळ उडाला नसता.
– दुर्गेश मंगेशकर, प्रवेश पूर्व परीक्षांचे मार्गदर्शक
पर्सेंटाईल पध्दत तांत्रिक दृष्ट्या योग्य असली तरी निकाल कसा लावला जातो, याबाबत शंका आहे. सर्वसामान्यांना निकाल समजेल या पध्दतीने तो जाहीर करणे अपेक्षित आहे. निकालात एकूण गुणांचा उल्लेख केला असता तर विद्यार्थी व पालकांच्या मनात शंका निर्माण झाली नसती. कोणते विद्यार्थी अधिक गुण घेऊन पुढे आहेत, याबाबतची माहिती समजू शकली असती.
– हरिष बुटले, प्रवेश पूर्व परीक्षांचे मार्गदर्शक