पुण्याचेही निकाल आश्‍चर्यकारक असतील

पृथ्वीराज चव्हाण : मोदींचा लोकशाही मान्य असल्याचा केवळ देखावा

पुणे – नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपला मतदार संघ सोडून जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. तेथे वेगळा निकाल लागला तर आश्‍चर्य वाटू देऊ नका. तसेच वातावरण पुणे मतदार संघात आहे. गेल्या चार दिवसांत या मतदार संघातील मतदारांचा प्रतिसाद पाहता पुणे लोकसभा मतदार संघातही आश्‍चर्यकारक निकाल लागल्याशिवाय राहणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा कॅम्प एज्युकेशन सोसायटी येथे झाला. यावेळी मोहन जोशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, कमल ढोले पाटील, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, भीम आर्मीचे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ, लता राजगुरू, रफिक शेख, विठ्ठल थोरात, भोलासिंग अरोरा, सईम शेख, भारत कांबळे, प्रदीप गायकवाड, अशोक कांबळे, रशीद शेख, माजी महापौर प्रशांत जगताप, वालचंद संचेती आदी उपस्थित होते.

“मोदींना सत्ता मिळाली परंतु त्यांची हुकुमशाही प्रवृत्ती आहे. लोकशाही मान्य असल्याचा ते केवळ देखावा करतात, अशी टीका चव्हाण यांनी केली. प्रकाश आंबेडकरांमुळे आणि त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांमुळे मते विभागली जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल’, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

“देशात लोकशाही आणायची की हुकुमशाही हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. दलितांची, बेरोजगारांची फसवणूक केली. कॉंग्रेसने केलेला अन्न सुरक्षेचा कायदा भाजपने रद्द केला’, अशी टीका बागवे यांनी केली.

“जाहीरनाम्यातील न्याय योजना मतदारांपर्यत पोहोचवा’
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली. लोकांना परिवर्तन हवे आहे, भेटल्यानंतर लोकच हे सांगतात. आता उरलेल्या दिवसांमध्ये राहुल गांधींचा संदेश, त्यांनी जाहीरनाम्यात दिलेली न्याय योजना या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी केले.

पर्वती मतदारसंघात पदयात्रा
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ पर्वती विधानसभा मतदार संघात पदयात्रा काढण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता मॅरेथॉन भवन येथून त्यास प्रारंभ झाला. छत्रपती मंगल कार्यालय येथे तिचा समारोप झाला. यात अभय छाजेड, अश्‍विनी कदम, नितीन कदम, शशिकांत तापकीर, विनायक हनमघर आदी सहभागी झाले होते.

नितीन गडकरी यांचा पराभव निश्‍चित : तांबे
राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. कॉंग्रेसच्या भूमिकेचे तसेच ध्येय-धोरणांचे स्वागत होत आहे. त्यामुळे नागपूरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभव निश्‍चित आहे, असे मत महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युवक कॉंग्रेसतर्फे राज्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांनी कॉंग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. राज्यात वेगवेगळ्या पातळीवर लोकांशी संवाद साधून आम्ही त्यांची मते जाणून घेत आहोत. युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना “न्याय’ योजनेची माहिती देत आहेत, असेही तांबे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.