नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रचारासाठी देश पिंजून काढत आहेत. दिवसाला त्यांच्या विविध राज्यात दोन ते पाच जाहीर सभा होत आहेत. त्यासाठी त्याना बराच प्रवास करावा लागतो. गुरुवारी देखील मोदींच्या पाच जाहीर सभा होत्या. सततच्या भाषणांचा परिणाम त्यांच्या घशावर झाला.
सायंकाळी प्रयागराज येथील रॅलीत ते पोहोचले तेव्हा त्यांचा घसा पूर्ण बसला होता. तरीही जनतेला निराश न करता त्यांनी 20 मिनिटे भाषण केले. एरवी ते किमान 40 मिनिटे भाषण करतात. सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी गुरुवारी मोदींनी उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये पाच जाहीर सभा घेतल्या.
सायंकाळी जौनपूर येथील रॅली आटोपून ते प्रयागराज येथे पोहोचले. 25 डिसेंबरनंतर मोदी 200 हून अधिक कार्यक्रमांत सहभागी झाल्याची माहिती पंतप्रधानांच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळाली आहे. यात बहुतांश निवडणूक कार्यक्रम होते.