अलीकडच्या काळात सिमेंटच्या किमतीत सतत वाढ होत आहे. मात्र, त्याचा रिअल इस्टेट क्षेत्रावर किरकोळ परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या हे क्षेत्र मंदीतून जात आहे. रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आले असले तरी आतापर्यंत फारसा सकारात्मक परिणाम रिअल इस्टेटवर पडताना दिसून येत नाही. सिमेंटची किंमत पाच महिन्यांत सुमारे 80 रुपये प्रतिबॅग एवढी वाढली आहे. याबाबत कन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ने चिंता व्यक्त केली आहे. क्रेडाईच्या मते, अपार्टमेंटची मागणी आणि पुरवठा यात बरेच अंतर पडले आहे.
याशिवाय रेरा आल्याने बिल्डर कोणताही नवीन प्रोजेक्ट आणताना दिसून येत नाही. त्यात सिमेंटच्या किमतीत वाढ होऊ लागल्याने सरासरी 50 रुपये प्रति चौरस फूट दर वाढण्याची शक्यता आहे. जर एखादा व्यक्ती एक हजार चौरस फुटाचा फ्लॅट खरेदी करत असेल तर आणि त्याने 3 हजार रुपये दराने फ्लॅट बुक केला असेल तर त्याला नव्या दरानुसार 50 हजारापर्यंत अधिक रक्कम भरावी लागेल किंवा 3050 रुपये चौरस फूट या हिशेबाने बिल्डरला पैसे द्यावे लागतील. मात्र या किमती अस्थिर स्वरूपाच्या आहेत. चार, पाच महिन्यांत सिमेंटची किंमत 290 ते 300 रुपये प्रति बॅग होऊ शकते. अशावेळी फ्लॅटच्या किमतीत वाढ होण्याची सूतराम शक्यता नाही. एकदा घर बुक केल्यानंतर खरेदीदारावर अनावश्यक दबाव टाकणेदेखील बिल्डरसाठी योग्य नाही. एकीकडे सिमेंट महाग होत असताना दुसरीकडे वाळू, रोडा, वीट, कचखडी, खडी याच्या किमतीही वाढलेल्या नाहीत. केवळ सिमेंट महाग झाले म्हणून घराच्या किमतीत वाढ करणे संयुक्तिक नाही.
– अवंती कारखानीस