बीजिंग – चीनमध्ये नव्याने करोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने चीन सरकारने हुबेई प्रांतासह वुहान येथील निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये आज करोनाच्या 78 नवीन केसेस उघड झाल्या असल्या तरी त्यातील 74 नवीन केसेस या विदेशातून चीनमध्ये आलेल्या लोकांच्या आहेत. स्थानिक पातळीवर चार जण या रोगाचे बाधित असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, चीनमध्ये या रोगामुळे आज एकूण सात जण दगावले आहेत. राजधानी बीजिंगमध्येही करोनाचे 522 रुग्ण आढळून आलेले आहेत. बीजिंगसह शांघाय शहरात येणाऱ्या पाहुण्यांना आता सक्तीने करोनासाठी न्युक्लिक ऍसीड टेस्ट द्यावी लागणार आहे. बीजिंगकडे येणारी प्रत्येक विमाने चीनच्या अन्य शहरांकडे वळवण्यात आली असून विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.