कोलकाता – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूकीतील उर्वरित टप्प्यांचे मतदान एकत्र घ्यावे अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. उर्वरित टप्प्याचे मतदान एकत्र घेतल्याने नागरिकांना करोनाचा संसर्ग होणार नाही, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
दरम्यान निवडणुकीतील उर्वरित टप्प्याचे मतदान एकत्र खेळण्याची कोणतीही योजना नसल्याचे निवडणूक आयोगाने आजच स्पष्ट केलेले आहे. राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांबाबत राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारादरम्यान करोनाशी संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल मधील निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचा प्रचार बुधवारी संध्याकाळी समाप्त झाला. पाचव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 17 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान आणखी 3 टप्प्यांचे मतदान होणे बाकी आहे.