अमृत योजनेतील खड्ड्यांचे डांबरीकरण पालिका स्वखर्चाने करणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अमृत योजनेतून 24 बाय 7 अतंर्गत संपूर्ण शहरभर रस्ते खोदाई सुरू आहे. रस्ते खोदाई केलेल्या कामात संबंधित ठेकेदाराने त्या-त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे हे बंधनकारक आहे. मात्र, पालिकेच्या स्थापत्य विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून प्रभाग क्रमांक 11 मधील खोदाई केलेले सर्व रस्ते डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. या विषयास आज (शुक्रवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या अमृत योजनेतून दोन टप्प्यात 24 बाय 7 प्रकल्प राबविण्यात येत आहे. या कामात पाणीपुरवठ्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात पहिल्या 40 टक्के आणि दुसऱ्या 60 टक्के या दोन टप्प्याचे काम सुरू आहे. त्या कामामुळे सर्वच प्रभागातील गल्लोगल्ली रस्ते खोदाई करण्यात आलेली आहे. रस्ते खोदाईमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून, रस्ते दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
त्यामुळे ज्या संबंधित ठेकेदाराने रस्ते खोदाई केली. त्याच ठेकेदाराकडून महापालिकेचे खोदाई केलेले रस्ते पुन्हा डांबरीकरण करून देणे हे बंधनकारक आहे. मात्र, स्थापत्य विभाग संबंधित ठेकेदाराकडून रस्ते डांबरीकरण न करता त्या कामासाठी स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया राबवू लागली आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊन करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होऊ लागली आहे.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी सभापती आश्विनी बोबडे, नगरसेवक संजय नेवाळे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे यांच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्थापत्य विभागाने मेहेरबानी दाखवत रस्ते डांबरीकरण करण्यासाठी स्वतंत्र निविदा राबविली आहे. त्यामुळे 24 बाय 7 योजनेतून रस्ते खोदाई झालेल्या नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर परिसरातील सर्वच रस्ते स्थापत्य विभाग डांबरीकरण करणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या 24 बाय 7 प्रकल्पांतर्गत खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास मे. क्लीन्सी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.