पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या 12 कोविड केअर सेंटर खासगी संस्था किंवा संघटनांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. मंगल कार्यालय व हॉटेल्समध्येही सेंटर सुरु केले जाणार आहेत. यामुळे दहा हजाराहून अधिक सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना बेड्स मिळू शकतील.
महापालिकेचे वायसीएम, भोसरी व जिजामाता रुग्णालय हे करोना उपचारासाठी आहेत. आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शाहूनगरचे रिजनल टेलिकॉम सेंटर, किवळेचे सिम्बॉयसिस महाविद्यालय, आकुर्डीतील डॉ. डी वाय पाटील महाविद्यालय, मोशीतील आदिवासी विभागाचे वसतीगृह, संत तुकाराम येथील डॉ. डी वाय पाटील महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुल वसतीगृह, मोशीचे सामाजिक न्याय विभागाचे वसतीगृह, चिखली घरकुल, म्हाळुंगे-चाकण येथील म्हाडा वसाहत येथे कोविड केअर सेंटर आहे. पालिकने सुरू केलेले हे कोविड केअर सेंटर खासगी संस्था व संघटनांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या तालेरा, भोसरी, आकुर्डी, सांगवी, यमुनानगर, थेरगाव, जिजामाता रुग्णालयात अन्य रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. पहिले सुरु करण्यात आलेले सेंटर खासगी संस्थांना दिल्याने तेथील मनुष्यबळ नव्याने स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये वापरता येणार आहे. तसेच मंगल कार्यालये, व हॉटेल चालकांना कोविड केअर सेंटर सुरु करण्यास पालिका परवानगी देणार आहे.
महापालिकेच्या वतीने आतापर्यंत 12 कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. हे सेंटर खासगी संस्थाना चालविण्यास देण्यात येणार आहे. कोविड सेंटरमध्ये एकूण दहा हजार बेडची सुविधा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
– अजित पवार, अतिरिक्त आयुक्त.