बाजार समितीच्या नऊ संचालकांचे राजीनामे

सभापतीच्या मनमानीला कंटाळल्याने निर्णय
सुजित झावरे यांच्याकडे राजीनामे सुपुर्द 

पारनेर – पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सभापती प्रशांत गायकवाड यांच्या मनमानीला कंटाळून जिल्हा उपनिबंधक यांच्या नावाने राजीनामे दिले. संचालकांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले.

पारनेर येथील बाजार समितीमधील बेबनाव अद्याप संपलेला नसून राष्ट्रवादीमध्ये असलेली बंडाळी पुन्हा उफाळली आहे. बाजार समितीच्या 9 संचालकांनी सुजित झावरे याच्याकडे आपल्या पदांचे राजीनामे दिले आहे. यामध्ये उपसभापती विलास झावरे, संचालक गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, खंडू भाईक, राहुल जाधव, विजय पवार, मिराबाई वरखडे, हर्षल भंडारी, सोपान कावरे या संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नावाने राजीनामे दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समिती सभापती व संचालक मंडळ यांच्यातला बेबनाव सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे गेल्या काही महिन्यांपूर्वीच सभापतीवर अविश्‍वास ठराव आणण्यात आला होता. परंतु अविश्‍वास ठरावावेळी सर्व संचालक अनुपस्थित राहिल्याने तो बारगळला. आता पुन्हा एकदा विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून सुजित झावरे हे राजीनामे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे देणार आहेत. त्यावर अजित पवार काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे असून त्यानंतरच पुढील निर्णय सुजित झावरे व संचालक मंडळ घेणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.