मुंबई: महाराष्ट्रातील सुमारे साडे चार हजार निवासी डॉक्टरांनी आज शुक्रवारी पश्चिम बंगाल मधील कनिष्ट डॉक्टरांच्या संपाला पिांठंबा देण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने तसेच राज्यातील कनिष्ट डॉक्टरांनी हा संप आयोजित केला होता. त्यांनी आज या संपकाळात सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत काम बंद ठेवले होते. त्यामुळे रूग्णालयातील उपचारांचे काम या काळात विस्कळीत झाले होते. तथापी संपकाळात आणिबाणीची सेवा सुरू ठेवण्यात आली होती.
पश्चिम बंगाल मधील कनिष्ट डॉक्टरांनी सेवाकाळात आपल्याला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी या मागणीसाठी मंगळवार पासून संप पुकारला आहे. एनआरएस मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात एका मृत रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडून हेळसांड झाल्याचा आरोप करून डॉक्टरांवरच हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे त्या डॉक्टरांनी तेथे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रात हा संप करण्यात आला.