चारचाकी अपघात टाळण्यासाठी “स्मार्ट सेफ्टी फिचर्स’
पुणे – महापालिकेतील दोन अभियंत्यांनी केलेल्या एका संशोधनाची थेट ऑस्ट्रेलियन सरकारने दखल घेतली. त्यासाठी त्यांना “इनोव्हेशन पेटंट ग्रांट’ हे प्रमाणपत्रही दिले आहे. चारचाकी चालवताना अपघात झाल्यास गाडीतील व्यक्तींना झटका बसणार नाही आणि गाडी उलटणार नाही यासाठी त्या दोघा अभियंत्यांनी खास “स्मार्ट सेफ्टी फिचर्स’ तयार केले आहेत. त्याला ऑस्ट्रेलियन सरकारने वाखाणले आहे.
महापालिकेच्या पथ विभागातील कनिष्ठ अभियंता अभिजित भुजबळ आणि उप अभियंता अमर मदिकुंट यांनी “स्मार्ट सेफ्टी फिचर्स टू रिड्यूस इम्पॅक्ट ऑफ ऍक्सिडेंट अँड प्रिव्हेंटिंग ओव्हरटर्निंग ऑफ व्हेईकल’ हे संशोधन केले आहे. हायवेवर होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी हे संशोधन करण्याचा निर्णय घेतला. करोना संकटकाळात सर्वेक्षणाची जबाबदारी आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी हे यशस्वी संशोधन केले.
चारचाकीला अपघात झाल्यास चालकासह गाडीतील व्यक्तींना मोठा धक्का बसतो. अशावेळी वाहन वेगात असेल तर ते उलटूही शकते. असे अपघात हे प्राणांतिक असतात. ते टाळण्यासाठी या दोघांनी चारचाकीच्या रचनेतच बदल केले आहेत. त्यामध्ये चारचाकीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला “फ्लेक्झिबल बंपर’ बसवले आहेत. त्यामुळे अपघातानंतर बसणारा धक्का “ऑब्झर्व्हर’च्या माध्यमातून कमी तीव्रतेचा होऊ शकतो.
याशिवाय, विशिष्ट प्रकारचे “सेन्सर रॉड’ही चारचाकीत बसवले आहेत. चारचाकी “ओव्हरटर्न’ होताना रॉड खुले होणार असून, त्यामुळे गाडी पलटणार नाही, असे या दोघांनी सांगितले. भुजबळ यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून, त्यांनी “मोटर मेकॅनिकल व्हेईकल’ या विषयात आयटीआयही केले आहे. या संशोधनाची दखल घेतली गेल्याने अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया मदिकुंट यांनी दिली.