दखल : बचाव पथकाला ‘बघ्यांच्या गर्दी’चा अडथळा!

-जयेश राणे

प्राणावर बेतणाऱ्या कठीण प्रसंगात आपल्याकडून कोणाला साहाय्य होणार नसल्यास जे दुर्घटनाग्रस्तांना साहाय्य करत असतात. त्यांच्या मार्गात ‘अडथळा’ ठरण्याची आपल्याकडून कृती होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. अशा वेळी प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. प्रसंग आणि वेळ यांचे गांभीर्य लक्षात न घेणे म्हणजे दुर्घटनाग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणे होय.

रस्ते-रेल्वे, पूर-भूकंप, आग लागणे, मनुष्य वस्तीत बिबट्याचा प्रवेश आदी घटनांच्या वेळी दुर्घटनाग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी बचाव पथके घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यासाठी आटापिटा करतात. तिथे पोहोचून दुर्घटनाग्रस्तांना साहाय्य करण्यासह आणखी एक मोठे आव्हान कायम समोर असते, ते म्हणजे कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर त्याठिकाणी जमा होणारी “बघ्यांची गर्दी’! यांना घटनेचे काहीही सोयरसुतक नसते. घटनेचे चित्रीकरण करायचे आणि सोशल मीडियावर “तात्काळ’ पोस्ट करायचे. हेच यांचे काम. “तात्काळ’ या शब्दाचा अर्थ यांच्या भाषेत कसा आहे , हे त्यांच्या कृतीवरून कळते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक पथक दुर्घटनाग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी आलेले असते, तर बघ्यांची गर्दी ही बचाव पथकाच्या कार्यात अडथळा निर्माण करत असते. या प्रसंगी पाकीटमार, मोबाईल आदी वस्तूंची चोरी करणाऱ्यांचे फावते. गर्दीचा गैरफायदा उठवून “हात साफ करून घेण्याची चालून आलेली संधी’ म्हणून चोर याकडे पाहत गर्दीतीतील उपस्थितांना हिसका दाखवतात.

त्याविषयी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले जाते. आपल्याला दुसऱ्याला साहाय्य करण्याची इच्छा नाही. तरीही तिथे गर्दी वाढवण्यासाठी का जायचे? त्या ठिकाणी गेल्यावर वस्तू चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यातही दाखल व्हायचे. प्रसंग काय आहे? आणि आपण काय करत आहोत? याचे भानही त्या मंडळींना नसते.

आपली वस्तू चोरल्याचे एवढे वाईट वाटते, तर दुर्घटनाग्रस्तांना किती त्रास होत असेल? यामध्ये कोणी मृत पावतो, घायाळ होतो, तर कोणी कायमचा जायबंदी होतो. प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांना वस्तुनिष्ठ माहिती पोलिसांना द्यायची असते. अशा प्रसंगी पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण असतो, त्यांची प्रचंड धावपळ चालू असते. पोलिसांची कुमक अल्प असल्यावर जवळील विभागाकडून अतिरिक्त कुमक मागवावी लागते. ती येईपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान असते.

दुर्घटनेच्या वेळी “उतावीळ’ नागरिकांनी “कॉमन सेन्स’चा उपयोग करणे अनिवार्य असते. त्याचाच उपयोग न करणाऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी जादा वेळ द्यावा लागतो. आगीसारख्या दुर्घटनेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि घटना स्थळी असलेल्या माणसांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल शर्थ करत असते. हे करत असताना काही अग्निशमन जवान घायाळ होतात, काही हुतात्माही होतात.

दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली जाते. दुर्घटनेवेळी सर्वत्र हाहा:कार उडालेला असतो. त्या स्थितीत बचावकार्य करणे, हे अत्यंत आव्हानात्मक असते. कारण दुर्घटनाग्रस्तांची भयभीत स्थिती, आक्रोश आदी वातावरणात साहाय्याचे काम निरंतर चालू ठेवायचे असते.

पुणे येथील मुंढवा परिसरातील केशव नगर येथे बिबट्याने अलीकडेच हल्ला केला. त्यात सुमारे सहाजण घायाळ झाले. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या बोरीवली, मुलुंड या परिसरातही बिबट्या वारंवार फिरत असतो. त्यामुळे दाट वस्ती असली तरी बिबट्याच्या थरारामुळे रात्रीच्या वेळेस बाहेर पडण्यास कोणी धजावत नाही.

बिबट्याविषयी काही मंडळींना कुतूहल असते. त्यामुळे बिबट्या अमूक ठिकाणी धुमाकूळ घालत आहे, अशी वार्ता पसरताच अनेकजण त्या ठिकाणी पोहोचतात. त्यामुळे गर्दीला पाहून बिथरलेला बिबट्या कुठेतरी कोपऱ्यात लपून बसतो आणि त्याला पकडणे वनविभाग, अग्निशमन दल जवान आदींना कठीण होऊन बसते. त्याला पकडताना काही वेळेस भूल येणारे इंजेक्‍शन (डार्ट) मारावे लागते. यातील बघ्यांची गर्दी ही या सर्व प्रसंगाकडे एक “थरारक मनोरंजन’ म्हणून पहात असते. वास्तवातील असे प्रसंग म्हणजे “सर्कस’ नव्हे.

बिथरलेला बिबट्याच्या आक्रमणाचा तडाखा काही प्रसंगी बघ्यांनाही बसलेला आहे. “स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे’ म्हणतात, ते हे असे. त्याला जेरबंद करेपर्यंत बचाव पथकाच्या जीवात जीव नसतो. बिबट्याला जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत बचावपथक तिथून काढता पाय घेऊ शकत नाही. मात्र तोपर्यंत वेळेची उपलब्धता असणारे बघेही तिथेच रेंगाळत राहतात. बिबट्याला इजा होऊन त्याचे परिवर्तन त्याला मोठी हानी पोहोचून, त्याच्या प्राणावर बेतण्यात होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी लागते. एवढ्या सर्व गोष्टी एका बिबट्या भोवती फिरत असतात. बिबट्यासह माणसांनाही वाचवायचे असते. यावरून किती बाका प्रसंग त्या वेळी उभा राहत असेल हे सहज लक्षात येते.

पूर-भूकंप, अपघात आदी प्रसंगी साहाय्याची आवश्‍यकता असतेच. त्यावेळी काही सुजाण नागरिक बचाव कार्यात सहभागी होऊन दुर्घटनाग्रस्तांना साहाय्य करण्यात मोलाची भूमिका बजावतात. त्यांचा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद असतो. बिबट्यासारख्या चपळ, बलवान अशा वन्य प्राण्याला पकडण्यासाठी त्याच धाटणीच्या प्रशिक्षित बचाव पथकाची आवश्‍यकता असते.

दुर्घघटनेनुसार बचाव पथकाची कार्य कुशलता बदलत असते. रस्त्यावरील भटके कुत्रे त्यांना कोणीतरी पकडण्यासाठी आलेले आहे, हे त्यांच्याकडचे साहित्य पाहूनच ते ओळखतात आणि त्यांच्यापासून पळ काढतात. अशा वेळी जे कुत्रे तावडीत मिळतील त्यांना पकडून कुत्रा गाडीतून उचलून नेले जाते. कुत्रे पकडताना किती दमछाक होते, हे अनेकांनी रस्त्यावर पाहिले असेलच.

भटक्‍या कुत्र्यांच्या त्रासाने विशेषत: शहरी भागातील जनता वैतागली आहे. येथे तर बिबट्याला पकडायचे आहे. गेले आणि त्याला पकडून आणले असे शक्‍य नाही. त्यासाठी तासंतास खर्ची घालावे लागतात. नाही म्हटले तरी एक माणूस म्हणून मनामध्ये बिबट्याच्या आक्रमकतेविषयी त्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या पथकाच्या मनातही त्याच्याविषयी भीती ही असणारच.

काहीही झाले तरी शेवटी ते मनुष्याचे मन आहे. त्यात प्रसंगानुरूप विचारांचे काहूर चालू असणारच. प्रसंग आवाक्‍यात येऊ लागल्यावर विचारांचे वादळ शांत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)