सातारा, {संदीप राक्षे} – जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाटणमधील बंडखोरी वगळता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे सरळ लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांच्या निकालानंतर नक्की बालेकिल्ला कोणाचा हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून जिल्ह्यात राजकीय संघर्ष टोकाला पोहोचणार आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्यावतीने यावेळी पुन्हा पाचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने अमित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे कमळ विरुद्ध मशाल अशी लढत रंगणार आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई विरुद्ध शरदश्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजित पाटणकर अशी पारंपरिक लढत अपेक्षित होती.
मात्र, महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये मतदारसंघ उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडे गेला. ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे सत्यजितसिंह पाटणकर यांनी बंडखोरी करत येथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले अशी तुल्यबळ लढत होणार आहे. या दोघांनी यापूर्वी २०१४ व २०१९ मध्येही ही एकमेकांविरुद्द लढत दिली. त्त चव्हाण यांनी बाजी मारली. यावेळीही येथे अटीतटीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शरदश्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब पाटील सलग सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व मनोज घोरपडे यांच्या दोघांच्या नावाची चर्चा होती.
मात्र, अंतिम यादीमध्ये मनोज घोरपडे यांचे नाव निश्चित झाले. घोरपडे यांना धैर्यशील कदम यांची मदत मिळणार आहे. रामकृष्ण वेताळ यांचीही फौज ताकद लावणार आहे
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महेश शिंदे विरुद्ध शरदश्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे पुन्हा एकमेकांविरोधात उमेदवार असून दोघांमध्ये काटे की टक्कर पाहयला मिळणार आहे. दोन्ही नेते आक्रमक असून तुल्यबळ असल्यामुळे सर्वसामान्य जनता कोणाला कशी साथ देईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मतदारसंघाकडे हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून पाहिले जात आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघात नुकताच राजकीय भूकंप झाला. याठिकाणी अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार दीपक चव्हाण यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली. यामुळे या ठिकाणी दीपक चव्हाण यांच्याविरोधात अजित पवार गटाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार ठरणार आहे.
माण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून जयकुमार गोरे उमेदवार चौकार मारण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून रा,ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोरेविरोधातील सर्व इच्छुकांनी घार्गे यांच्या नवाला पसंती दिल्यामुळे याठिकाणी गोरे आणि घार्गे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.