शिक्रापूर (प्रतिनिधी):- सणसवाडी (ता. शिरूर) येथील कंपनी कामगारांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर ‘त्या’ बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील सात जणांचे अहवाल आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी पाठविण्यात आले होेते. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून त्या सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका कंपनीतील एका कामगाराचा कंपनीने केलेल्या तपासणीमध्ये सणसवाडी मध्ये राहणाऱ्या स्थानिक कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. तर याच कंपनीतील अजून एका कंपनी कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने नागरिक व ग्रामस्थ देखील भयभीत झाले होते. आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील सात जणांचे स्बॅव तपासणी साठी घेण्यात आले होते.
तपासाणीसाठी घेण्यात आलेल्या सात जणांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून सातही जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे सणसवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सणसवाडी येथे सदर कोरोना बाधित व्यक्तीच्या घरी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत प्रशासनाला योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहे. तर आरोग्य विभागाच्या वतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.