बेल्हे -करोनाची लागण होऊन औरंगपूर (ता. जुन्नर) येथील मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्तींना लेण्याद्री कोविड सेंटरमध्ये तपासणी करिता दाखल केले होते. त्या चौघांचाही अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक संभाजी घोडे यांनी दिली.
तरीही या व्यक्तींना खबरदारी म्हणून काही दिवस क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.गावातील मृत व्यक्ती औरंगपूर गावामध्ये 18 मे रोजी मुंबईवरून आली होती. करोनाची लक्षणे दिसत असल्याने या रुग्णाला 27 मे रोजी पुणे येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी (दि.28) रात्री उशिरा या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला व शुक्रवारी (दि. 29) पहाटे ही व्यक्ती मृत्यू झाली होती. त्यामुळे औरंगपूर गाव व आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील गावे यामध्ये पारगाव, निमगाव सावा हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.