अल्पवयीनांच्या बेफिकीरीला लगाम

कल्याणी फडके
पुणे – अल्पवयीन मुलांकडून वाहतुकीचे नियमभंग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेदकार आणि बेफिकीरपणे गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. यंदाच्या वर्षांत वाहतूक शाखेने सुमारे 195 जणांवर कारवाई केली आहे.

कारवाई करून पालक आणि मुलांना याबाबत अधिक गांभीर्य नसल्याचे चित्र शहरात दिसते. कारवाई करण्यात येणाऱ्या मुलांच्या पालकांना वाहतूक पोलिसांकडून समज देखील देण्यात येत आहे. याशिवाय वाहतूक शाखेकडून खटला देखील दाखल करण्यात येतो. अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याबरोबर त्यांना वाहन चालवण्यास देऊ नये, असे आवाहनही वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

नियम आणि कायदे करून देखील नागरिकांकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारवाई करण्यात येणारी मुले बहुतांश वेळा विनापरवाना वाहन चालवतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 16 ते 18 वयोगटातील मुलांसाठी पालकांच्या संमतीने विशेष लायसन्स दिले जाते खरे. हे लायसन्स 50 सीसीपेक्षा कमी क्षमता असणाऱ्या गाड्या चालवण्यासाठी दिले जाते. मात्र, सध्या बाजारात कोणतीच गाडी 50 सीसीची उपलब्ध नाही.
नव्या वाहतूक कायद्यानुसार शिक्षेत वाढ
नव्याने मोटार वाहन कायद्यामध्ये केंद्र सरकारने केलेल्या बदलानुसार पालकांना मुलांच्या हातात गाडी सोपवणे महागात पडणार आहे. नव्या पारित झालेल्या कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवर कारवाई केल्यानंतर प्रकरण न्यायालयात पाठवले जाणार आहे. न्यायालय पालकांना तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि पंचवीस हजार रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
वाहतूक शाखेकडून महाविद्यालयांमध्ये समुपदेशन
शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पोलिसांबरोबरच तरुणाईचा पुढाकार गरजेचा आहे. या हेतूने वाहतूक शाखेकडून आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाहतूक शाखेचे अधिकारी समुपदेशन करत आहेत. जुलै महिन्यापासून वाहतूक शाखेतर्फे 52 हून अधिक महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये “रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले.

16 ते 18 वयोगटांतील विद्यार्थी सर्रास गाडी चालवतात. विद्यार्थ्यांनी निदान स्वत:ची सुरक्षितता लक्षात घेता वाहन वेगाने नये. नियमांचे पालन न केल्याने जीवन आणि करिअरवर परिणाम होऊ शकतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. यासह पालकांनी देखील अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये गाडी देऊ नये. रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्‍यता असते. दिवसेंदिवस रस्ता आणि वाहन तरूणाईच्या जीवनाचा अविभाज्य घटक होत आहे; परंतु तरूणाईने वाहन जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने वापरणे गरजेचे आहे.
– राजेश पुराणिक, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.