पुणे -लाल रंगाची चुटूक आणि लक्ष वेधून घेणाऱ्या चेरीचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात हिमाचल प्रदेश येथून ही आवक होत आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रतिकिलो चेरीला 300 ते 450 रुपये असा भाव मिळत आहे.
येथील बाजारात हिमाचल प्रदेशातून चेरीच्या 500 ते 600 बॉक्सची आवक झाली. यंदा पोषक हवामानामुळे चेरीचे उत्पादन आणि चेरीचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे चेरीला घरगुती ग्राहक तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून चांगली मागणी आहे. चेरीचा हंगाम आणखी दीड महिना सुरू राहील, असे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
दोन जातींच्या चेरी बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे मिस्ट्री चेरी आणि दुसरी मखमली चेरी. मखमली चेरीची चव आंबट -गोड आहे तर, मिस्ट्री चेरीची चव गोडसर आहे.
एकदम लालबुंद मिस्ट्री चेरीला बाजारात विशेष मागणी आहे. हिमाचल प्रदेशनंतर काश्मिरी चेरीचा हंगाम सुरू होईल. काश्मीर येथील चेरीची आवक जुलै अखेपर्यंत सुरू असते. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत चेरीची आवक चांगली होत असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे. किरकोळ बाजारात 400 ते 500 रुपये किलो भावाने चेरीची विक्री होत आहे.