छोट्या संवर्गातील सुधारित परिपत्रकाला स्थगिती
पुणे -राज्य शासनाने छोट्या संवर्गामधील मागासप्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्याची कार्यपद्धती निश्चित करून, तशा मार्गदर्शक सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे नोकरी भरतीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होणार होती. मात्र, शासनाने गुरुवारी दोन दिवसांपूर्वी काढलेल्या छोट्या संवर्गातील सुधारित बिंदूनियमावलीच्या (रोस्टर) परिपत्रकाला स्थगिती दिली आहे. परिणामी, पुन्हा नोकर भरती रखडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) 16 टक्के ऐवजी 13 टक्के आरक्षण लागू केले आहे. यामुळे राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील सरळसेवा भरतीसाठी एकूण नियुक्त्यांच्या 13 टक्के इतक्या जागा हा मराठा समाजासह “एसईबीसी’ वर्गासाठी निश्चित केल्या आहेत. शासनाने यानुसार सुधारित बिंदूनामावली तयार करून भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश जारी केले होते. त्यामुळे नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला होता. आता सर्वच प्रशासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांमध्ये भरती करण्याची कार्यवाही सुरू होणार होती. मात्र, हा निर्णय तत्काळ स्थगित कल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी 13 टक्के आरक्षणासह सुधारित बिंदूनियमावली शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे बिंदू नियमावली तपासणीचे काम पुन्हा प्रलंबित राहणार आहे.