“आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.”

राजेश टोपे यांचे प्रकाश जावडेकर यांच्या आरोपांना उत्तर

मुंबई : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक लसीकरण केंद्र लस नसल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले होते. त्यानंतर केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता जावडेकरांनी केलेला दावा फेटाळून लावत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे सर्व आरोप फेटाळत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले. आरोग्यमंत्री म्हणाले की, “लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे, ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.” पुढे आणखी एक ट्वीट करत राजेश टोपे जावडेकरांना म्हणाले की, “आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.”

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसींचा पुरवठा कमी असल्याची तक्रार करत महाराष्ट्रासोबत दुजाभाव होत असल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेत बोलताना केला होता. या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकरांनी राज्याकडे आजही 5 ते 6 दिवसांचा लसींचा साठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. “महाराष्ट्र सरकारकडे आज सकाळपर्यंत 23 लाख लसीचे डोस आहेत. दिवसाला 6 लाख लावले, तरी त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या दिवशी येतात. 3-3 दिवसांचे डोस पाईपलाईनमध्ये असतात. 23 लाख म्हणजे 5 ते 6 दिवसांचा स्टॉक आहे. आता तिथून जिल्ह्यांमध्ये ते वितरीत करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडून राज्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा दिला जातो. काल जेवढा पुरवठा असेल, त्याहून जास्त आज दिला जातो. आज जेवढा दिला, त्याहून जास्त उद्या मंजूर होईल. अशी पद्धत आहे.” असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.