मतदानातील उदासीनतेचे वास्तव

अलीकडच्या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की, अशिक्षित लोक सुशिक्षितांपेक्षा अधिक हिरीरीने आणि उत्साहाने मतदान करतात. यामागची कारणे नीट समजून घेतली पाहिजेत. सुस्थित आणि सुशिक्षित लोक मतदान का करत नाहीत आणि गरीब-अशिक्षित लोकच मतदान का जास्त करतात यामागे लोकशाहीची काही मूलभूत तत्त्वे आहेत.

लोकशाही म्हणजे नेमके काय, याची गहन चर्चा करणारे विद्वान पंडित लोक भरपूर शब्दच्छल करून चर्चा करतीलही. पण गरीब माणसासाठी लोकशाही म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला आपली परिस्थिती बदलण्याची संधी देणारी राज्यव्यवस्था आहे. आज गरीब लोक शिकत आहेत आणि आपल्या दुरवस्थेतून वर उठून चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या प्रत्येकालाच त्यात यश येईल असे नाही. यश येवो, अपयश येवो की मर्यादित यश येवो पण स्वत:च्या स्थितीत बदल घडविण्याची संधी उपलब्ध आहे हा त्यांच्यासाठी समाधानाचा मुद्दा आहे आणि ही संधी त्यांना लोकशाहीमुळे मिळत आहे. एकंदरीत ज्यांना लोकशाहीची छान व्याख्या सांगता येते त्यांच्यासाठी लोकशाही ही निकडीची गरज नाही; परंतु ज्यांना लोकशाहीची व्याख्या कळत नाही त्या गरीब-अशिक्षित लोकांसाठी लोकशाही ही निकडीची गरज आहे. म्हणून हा गरीब-अशिक्षित ग्रामीण मतदार अधिक उत्साहाने मतदान करायला लागला आहे.

या माणसाला लोकशाहीमुळे आपली प्रगती होऊ शकते याचे प्रत्यंतर अलीकडच्या काळात प्रकर्षाने यायला लागले आहे. म्हणून त्यांचा लोकशाहीवरचा विश्‍वासही वाढायला लागला आहे आणि मतदानाच्या बाबतीतला उत्साह वाढत आहे. काही उच्चभ्रू लोक गरीब आणि झोपडपट्टीत राहणारे लोक पैसे मिळतात म्हणून ते मतदान करतात असा उपहास करतात. पण शहरातले सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोकही मतदानासाठी मोबदला मागायला लागले आहेत. त्यामुळे हा भेदभाव चुकीचा आहे. उलट गरीब असला तरीही लोकशाहीमुळे सन्मानाचे जीणे जगू शकतो. वर्षानुवर्षाची लाचारी झुगारून देऊ शकतो, ही या वर्गातली भावना आहे. ती नीट समजून घेतली नाही आणि तिचा मतदानाशी काय संबंध आहे याचे नीट विश्‍लेषण केले गेले नाही तर आपल्या लोकशाही समजून घेण्यामध्ये अडचण येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.