नवी दिल्ली – केंद्रातील एनडीए सरकारने नोकरशाहीत मागील दाराने भरती (लॅटरल एंट्री) करण्याचे पाऊल मागे घेतल्यानंतर कॉंग्रेसने शाब्दिक हल्लाबोल करण्याचे सत्र कायम ठेवले आहे. लोकसभा निवडणूक निकालाला जे भाजपचा विजय म्हणत होते; त्यांना आता जनादेशाचा खरा अर्थ समजला असावा. अवघ्या २ महिन्यांत सरकारला ४ वेळा पाऊल मागे घेणे भाग पडले आहे, असे कॉंग्रेसने म्हटले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. लॅटरल एंट्रीबाबतचा प्रस्ताव रद्द करणे हे सरकारच्या माघारीचे ताजे उदाहरण आहे. नोकरशाहीत आपल्या पसंतीच्या लोकांची भरती करण्याची सरकारची योजना होती.
मात्र, विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवल्याने आणि देशभरातून आवाज उठल्याने सरकारला ३ दिवसांतच ती योजना सोडून द्यावी लागली. याआधी सरकारला जोरदार टीकेमुळे ब्रॉडकास्ट विधेयकाचा मसुदा मागे घ्यावा लागला. सरकारने मागील १० वर्षांत संसदेची अवहेलना करून जबरदस्तीने विधेयके मंजूर केली.
त्या सरकारला वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणे भाग पडले. मध्यमवर्गाच्या प्रचंड नाराजीमुळे सरकारला मालमत्तेच्या विक्रीवरील इंडेक्सेशन लाभही पुन्हा प्रदान करावा लागला. जनतेने मतांची ताकद दाखवून मोदींना रोखले आहे, असे भाष्य रमेश यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला (एनडीए) जोरदार टक्कर दिली. त्यामुळे बहुमताचा पल्ला पार करताना एनडीएची दमछाक झाली. भाजपचे संख्याबळ मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत लक्षणीयरित्या घटले.
त्यामुळे यावेळी सरकारचे कामकाज चालवताना भाजपला मित्रपक्षांवर विसंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे बेधडक पाऊले उचलताना सरकारवर मर्यादा येणार असल्याचे मानले जाते. त्याचा संदर्भ देऊन रमेश यांनी सरकारला घेरले.