पुणे – महापालिकेच्या रिकाम्या जागा, बांधिव मिळकती तसेच इतर मालमत्तांचे रेडी रेकनरनुसार बाजारमूल्य तब्बल 55 हजार कोटींचे झाले आहे. पत निश्चितेसाठी या मिळकतींचे नुकतेच मूल्यांकन केले होते. त्यातून ही रक्कम समोर आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मिळकतींवर अतिक्रमणे होत असल्याने पालिकेने या मिळकतींचे “जीआयएस पॉलिगॉन मॅपिंग’ हाती घेतली आहे. आतापर्यंत 3,267 मिळकतींचे मॅपिंग झाले आहे.
शहरात महापालिकेच्या मालकीच्या किंवा विविध कारणांसाठी संपादित केलेल्या 3,800 मिळकती आहेत. त्यामध्ये शाळा, रुग्णालये, क्रीडांगणे, उद्याने, सांस्कृतिक भवन, अग्निशमन केंद्र, भाजीमंडई, क्षेत्रीय कार्यालये, पाणीपुरवठा केंद्र, स्मशानभूमी, दफनभूमी, मल:निस्सारण प्रकल्प, ऍमिनिटी स्पेस, चाळ विभागाकडील मिळकती, समाजमंदिरे, अभ्यासिका, “आर’अंतर्गत तसेच आरक्षणाच्या बदल्यात ताब्यात आलेल्या जागा, विरंगुळा केंद्रे आदी मिळकतींचा समावेश आहे. मात्र, अनेक मिळकती करार न करता वापरण्यात येत होत्या. तर अनेक मिळकतींचा सात-बाराच नावावर नव्हता. त्यामुळे महापालिकेने अशा मिळकती शोधत ताब्यात घेतल्या आहेत.
या मिळकतींवर सुरक्षा रक्षक नेमले जातात. मात्र, संख्या तुलनेने कमी असल्याने अतिक्रमणे होतात. पुढे याच व्यक्ती मिळकतींवर दावा सांगतात. परिणामी महापालिकेने या मिळकतींचे डिजीटल रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मॅपिंगद्वारे मिळकतीचे क्षेत्रफळ. अक्षांश-रेखांश नोंदवले जाते. जागेचे नाव, परिसर, सर्व्हे नंबरची नोंद ठेवली जाते. ही माहिती सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर राहते. यामुळे अतिक्रमण रोखण्यासाठी पालिकेस मदत होणार आहे.