लोकांमध्ये मिसळून समाजकार्य करणारा खरा कार्यकर्ता : मोहिते

सातारा – लोकांच्यात मिसळून त्यांच्यातला एक होवून काम करणारा कार्यकर्ता समाजाच्या कल्याणासाठी काम करु शकतो तसे खऱ्या अर्थाने समाज कार्यकर्ते उभं करण्याचे काम नेहरू युवा केंद्राच्या वतीने करण्यात येते, असे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राच्या महाराष्ट्र-गोवा राज्य संचालक ज्योती मोहिते यांनी केले.
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी येथे नेहरु युवा केंद्राच्या वतीने 15 दिवसीय निवासी नवनिर्वाचित राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे.

त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी धामणेर गावचे सरपंच, राज्याच्या स्वच्छता समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक कालिदास घाटवळ, कॅम्प इनचार्ज निशांत राउतेकर, प्राचार्य श्रीमती शाली जोसेफ, उपप्राचार्य भाई माने उपस्थित होते.

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यातील नवर्विाचित युवा स्वयंसेवकाचे प्रशिक्षण सातारा येथे आयोजित केले आहे. ज्या जिल्ह्यांनी महाराष्ट्राला नेतृत्व कसे करावे हे शिकविले आहे त्या ठिकाणी हे 15 दिवसाचे प्रशिक्षण होत असल्यामुळे यातून उद्याचे नेतृत्व उभे राहील अशी अपेक्षा ज्योती मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली. उद्याचा समर्थ भारत घडविण्याची ताकत तुमच्यात असून तुम्ही ते तळमळीने कराल, अशी नेहरु युवा केंद्राची खात्री असल्याचेही मोहिते यांनी यावेळी सांगितले.

धामणेर गाव एकेकाळी संवेदनशील गाव म्हणून पोलिस दप्तरी नोंद होती. मात्र गटातटाच्या भांडणात गावाचे भले नाही, याची जाणीव झाल्यानंतर गावाने एकत्र येवून काम केले. त्यानंतर जे काम उभे राहीले ते जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर देशातही गौरविले गेले. प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आणि विरोधक संपविण्यासाठी नव्हे तर विरोध संपविण्यासाठी काम केले तर विकासाचे डोंगर उभे राहतात असे अनुभवाचे बोल धामणेरचे सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केले. आभार भानुदास यादव यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.