सोने इतरत्र हलविले नाही रिझर्व्ह बॅंकेकडून स्पष्टीकरण जारी

मुंबई – 2014 मध्ये किंवा त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने भारतातील सोने देशाबाहेर हलविले नाही हे स्पष्टीकरण स्वतः रिझर्व्ह बॅंकेने केले आहे. काही समाज माध्यमात आणि वृत्तपत्रात रिझर्व्ह बॅंकेने 2014 मध्ये काही प्रमाणात सोने इतर देशात हलविले असल्याचे वृत्त येत होते. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने हे स्पष्टीकरण केले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जगभरातील रिझर्व्ह बॅंका काही सोने परदेशातील रिझर्व्ह बॅंकांमध्ये सुरक्षिततेसाठी ठेवीत असतात. भारतातही काही प्रमाणात आपले सोने सुरक्षेसाठी बॅंक ऑफ इंग्लंड मध्ये ठेवत आलेला आहे. मात्र, 2014 मध्ये किंवा त्यानंतर भारतातून परदेशात सोने हलविण्यात आले नाही. त्यामुळे समाज माध्यमात किंवा वृत्त माध्यमात यासंबंधात आलेले वृत्त चुकीचे आहे.

कॉंग्रेस पक्षाने एक ट्‌विट जारी करून त्यात म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेने 2014 मध्ये 200 टन सोने स्वित्झर्लंडमध्ये हलविले होते. कॉंग्रेसने हे ट्‌विट करताना वृत्त माध्यमात आलेल्या वृत्ताचा हवाला दिला होता. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने हे स्पष्टीकरण केले आहे. 1990 मध्ये परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात गरज होती. त्यावेळी भारताने काही सोने ब्रिटनमध्ये ठेवले होते असे बोलले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.