महापालिकेने मागविले साहित्याचे दर

शालेय साहित्य अनुदानाचे दर आठ दिवसांत ठरणार

पुणे – महापालिका शाळांमधील सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच गणवेशाचे अनुदान थेट बॅंकेत दिले जाणार आहे. त्यासाठी देण्यात येणाऱ्या साहित्याचे दर निश्‍चित करण्यासाठी महापालिकेने खुल्या बाजारातून सुमारे 161 वस्तूंचे दर मागविण्यात आले आहेत. या दरांचा आधार घेऊन हे अनुदान प्रत्येक इयत्तानिहाय निश्‍चित केले जाणार आहेत.

महापालिकेकडून मागील वर्षी पासून “डीबीटी’द्वारे मुलांना अनुदान दिले जाते. मात्र, ते ठरविण्यासाठी वस्तूचे दर निश्‍चित होणे आवश्‍यक असते. हे दर ठरविण्याचे काम महापालिकेच्या भांडार विभागाकडे देण्यात आले आहे. त्यानुसार, भांडार विभागाने ऑनलाईन पध्दतीने हे दर मागविले असून त्याच्या आधारावर यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे अनुदान निश्‍चित केले जाणार आहे. हे अनुदान निश्‍चित केल्यानंतर शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुलांची यादी तयार करून त्यानुसार, त्यांच्या बॅंक खात्यात 30 जून पूर्वी ही रक्कम जमा केली जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षी केंद्राने अनेक वस्तूंचा जीएसटी कमी केल्याने अनेक वस्तूंचे दर कमी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.