राखीव वनविभागाचे क्षेत्र गावठाणाच्या विस्तारासाठी देण्याची मागणी
नेवासा फाटा – नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे 12 हेक्टर 82 आर क्षेत्रापैकी चार हेक्टर क्षेत्र गावठाण विस्तारासाठी घरकुल व विविध शासनाच्या योजना राबविण्याच्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी झोपडपट्टीधारकांकडून नगर-औरंगाबाद रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे यांनी केले. यावेळी राजू साळवे, ऍड. बन्सी सातपुते, ऍड. अशोक करडक, ऍड. भाऊ सदाफुले, राजू बोलके, अमित मेहर, महेश निपुंगे, संजय निपुंगे, ग्रामपंचायत सदस्य माऊली देवकाते, गणेश माटे आदींसह झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऍड. सातपुते म्हणाले, वनविभागाचे 12 हेक्टर 82 आर क्षेत्र असून, वनविभागाच्या जागेवर सुमारे 47 वर्षांपासून अनेक दारिद्य्ररेषेखालील व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी चार हेक्टर क्षेत्र ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावे. तसेच केल्यास त्यांना शासकीय सुविधा मिळू शकतील.
सरपंच निपुंगे म्हणाले, वनविभागाच्या जागेत सुमारे 47 वर्षांपासून अनेक कुटुंबे राहात आहेत. त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी मोठा निधी ग्रामपंचायतीकडे पडून आहे. मात्र जागेच्या प्रश्नामुळे त्यांना मूलभूत सुविधा देण्यास अडचणी येत आहेत. याची शासनाने दखल घ्यावी. यावेळी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी वरिष्ठांकडे या प्रश्नावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी बंदोबस्त ठेवला.