मुंबई – राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून राजभवनालाही आता करोनाने विळख्यात घेतले आहे. राजभवनातील तब्बल 16 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या घटनेमुळे राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाची लागण झालेल्या 16 जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजभवनात एकूण 100 कर्मचारी आहेत. त्यापैकी 40 जणांचा करोना अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 16 जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 60 कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
करोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी तर काही पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राजभवनात एका इलेक्ट्रिकल शाखा अभियंताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर 16 जणांना लागण झाल्याचे समोर आले. लागण झालेले सर्व कर्मचारी राजभवनातील स्टाफ क्वार्टरमध्ये राहतात.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच कोश्यारी यांचीही करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे.