पुणे -जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली असून जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा मावळ तालुक्यात तब्बल 2 हजार 787.91 मिलीमीटर पडला आहे. मान्सूनचा दीड महिना शिल्लक असून या सरासरीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात साधारणत: 10 हजार 994 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल 13 हजार 636 मिलिमीटर पाऊस पडला आहे. म्हणजे सरासरीपेक्षा 400 मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे. चौदा तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाचा आढावा घेतला असता, दौंड तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे आतापर्यंत फक्त 161.13 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात मावळपाठोपाठ मुळशी, आंबेगाव, खेड, वेल्हे तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अद्यापही डोंगरमाथा असणाऱ्या मावळ, खेड, भोर वेल्हे आणि मुळशी या तालुक्यांत पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. गेल्या चोवीस तासांत मुळशीमध्ये सर्वाधिक 74.67, तर मावळ-66.86, भोर तालुक्यात 59.50 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यातील तालुक्यांमध्ये अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यात बारामती, इंदापूर शिरुर आणि दौंड या तालुक्यांत पावसाने हुलकावणी दिली आहे. या भागात सरासरी पेक्षा अत्यंत कमी फाऊस झाला आहे. इंदापूरमध्ये आतापर्यंत फक्त 222.11 मिलीमीटर पाऊस झाला असून या भागातील पावसाचरी एकूण सरासरी 421.40 मिलिमीटर आहे. दरम्यान, उजनी धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्याने इंदापूर, दौंड तालुक्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, पण शेतीसाठी आवश्यक भिज पाऊस झालेला नाही.