पावसाला म्हणे, आता बरसायचे नाहीय

पावसाला म्हणे, आता बरसायचे नाहीय
मी म्हटलं, आम्हालाही आता तरसायचे नाहीये
पाऊस म्हणाला…
खूप चारोळ्या करताय बुवा तुम्ही माझ्यावर..!
मी आल्यासारखा वाटलो की लगेच चारोळी
कळतच नाहीय मी आलोय की,
बरसतायत विरह गाणी की,
डोळ्यातलं टपटप पाणी..!
तुम्ही कवी मिलनात, विरहात चिंब भिजून घेता…
धरतीला मात्र माझ्या किती तरसवता…
मी भेटण्या आधीच काव्यरुपी बरसता !!
मी म्हटलं ये ना रे…
आमचं जरा बाजूलाच ठेऊ ..
तुझं अन धरे च मिलन तृप्त नेत्रांनी पाहू ..!

आणि काय गहजब झाला, खूप सिरियसली घेतलं त्याने. आणि असा बरसला की धूम ठोकत लोकांची त्रेधातिरपीट झाली ना हो!

कुठे धरणी तृप्त होऊन नद्या झुळझुळ वाहू लागल्या, झऱ्या झऱ्यातून सुमधुर संगीत बरसू लागले. धबधबे मात्र ओसंडून वाहू लागले. कवी कविता लिहू लागले. गायक सुंदर ताल सूरात गाऊ लागले. जिकडे तिकडे लगबग सुरू. याच दिवसात विविध स्पर्धा, कार्यक्रम, कलाकार याची झुंबड उडते. तर दुसरीकडे… पर्यटकांची तोबा गर्दी या निसर्गात रमायला, बरसणाऱ्या पाऊसधारा झेलायला, चिंब भिजायला, वडा, भजी पकोडे खायला लहान मोठी वृद्ध सगळेच.

हे एक रूप झालं पाऊस एन्जॉय करण्याचं. आणि दुसरं बिभत्स रूप पाहून निसर्गदेवता कोप पावली आहे याची जाणीव होते. अतिवृष्टीमुळे पिकांची हानी, भिंती कोसळणे, रस्ते उखडून मोठ्या डबक्‍या डबक्‍यात पाणी साचून लोकांची जाता येता फटफजिती झाल्याशिवाय राहत नाही,. अनेक समस्या, आजार नुकसान या अतिवृष्टीमुळे होतात आणि ते वरचेवर मानव जातीला भयंकर उपद्रव देणारे ठरतात, याला कारणीभूत आपणच आहोत.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणायचे आणि इकडे झाडं तोडून प्रचंड इमारती बांधायच्या. फिरायला भटकायला निसर्गात गेलं की जणू काही अंगात आल्यासारखं नाही तिथे निसर्गाची हानी करून यायची. प्लॅस्टिक कचरा, बाटल्या खाद्यपदार्थ याची सर्वत्र पेरणी करून यायची जसं पुढच्या पिढीसाठी हीच निशाणी मागे ठेवायची? अशाने पावसाचा खरा आनंद घेणारे बाजूलाच राहतात.

सामान्य माणसाने असा कायम किती दिवस निसर्गाला त्रास द्यावा हे ठरवावे. शेवटी पाऊस पावसाळा धनधान्य संपत्ती घेऊन येतो. पिकं डोलू लागतात, शेतकरी राजा त्याची बहरलेली शेती बघून खूष होतो. भारतीय पारंपरिक सणवार याच वर्षा ऋतूत उत्साहात पार पाडतात. पावसाने माणसाला खूप काही भरभरून दिलंय ते त्याचे विविध रुपात रूपांतर करून त्याचा उपयोग करून घ्यावा म्हणून. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वीज निर्मिती आणि विविध संशोधन या नवीन पिढीसाठी जणू खजिना आहे. पालकांनी शिक्षकांनी मुलांना आत्ता पासून ही शिस्त लावली तर निसर्ग हानी नक्कीच थांबेल. तर काय मग पावसात नुसतं आता भिजायचं नाहीय. नुसत्या कविता, गाणी, नुसते लेख नकोत. कृती करूया धरित्रीला संरक्षित ठेवण्याची.
शपथ घेऊया पावसाच्या पाण्यातून
नवनिर्मिती करण्याची,
सुंदर झाडे लावून ती
जोपासण्याची जबाबदारी आपलीच.

पावसाला बोलावणे एकवेळ सोपे, तो आला की त्याची विविध रूपे आवरणे कठीण .त्याला पावसाला खूष करायचे तर नक्कीच वरील काही नियम पाळून एन्जॉय केलं पाहिजे.
एन्जॉय करायचं आहे ना ! तर चला लागा कामाला कंबर कसून….
मान्सून!!

– वृषाली वजरीनकर

Leave A Reply

Your email address will not be published.