पुणे – फसवणुकीचे तब्बल 13 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीने रेल्वे नोकर भरतीचा नवा बाजार मांडला आहे. संबंधिताने यापूर्वी लष्कर भरतीच्या आमिषाने अनेकांना पाच कोटीचा गंडा घातला होता. विविध गुन्ह्यांमध्ये जामीन तसेच शिक्षा भोगून सुटल्यावर त्याने रेल्वे भरतीच्या नावे बनवेगिरी सुरू केली आहे. ही भामटेगिरी “डीआरएम’ कार्यालयात रुजू होण्यास आलेल्या एका तरुणामुळे उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केल्यावर ही बाब उघडकीस आली. विश्वजीत माने (52, रा. सांगली) असे अटक आरोपीचे नाव आहे. अजित खंडागळे (रा. ठाणे) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. दरम्यान खंडागळे सह आणखी दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक अश्विनकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास जाधव (रा. लातूर) हा तरुण पुणे रेल्वे कार्यालयात लिपिक पदासाठीचे अपॉइंटमेंट लेटर घेऊन आला होता. पत्र अधिकाऱ्यांनी बघितले असता, ते बनावट असल्याचे उघड झाले. यामुळे त्याला रेल्वे सुरक्षा दलाकडे पाठवून देण्यात आले.
त्याच्याकडून माहिती घेतली असता “विश्वजीत माने याने हे लेटर दिले असून, त्याला साडेतीन लाख रुपये दिले आहेत. उर्वरित 50 हजार रुपये घेण्यासाठी तो पुणे स्टेशन येथे येणार आहे.’ ही माहिती मिळताच सापळा रचून विश्वजीतला ताब्यात घेण्यात आले. माने सापडल्यावर त्याने आपण “अजित खंडागळेकडे कामाला असून फक्त लेटरची डिलिव्हरी करण्याचे काम करतो,’ अशी माहिती दिली.
फसवणुकीत माहिर
अजित खंडागळे याच्यावर दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांत फसवणुकीचे तेरा गुन्हे आहेत. त्याने लष्कर भरतीच्या नावे फसवणुकीत पाच वर्षे शिक्षाही भोगली आहे. सध्या त्याने रेल्वे भरती फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. तर माने याच्याकडे मिनिस्ट्री ऑफ होम आणि रेल्वे प्रवासी समितीचे बनावट ओळखपत्र सापडले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर
खंडागळे हा दिल्ली तसेच ठाण्यातून हाताखालील चार ते पाच जणांच्या संपर्कात असतो. या लोकांना तो अपॉइंटमेंट लेटर समोरच्या व्यक्तीस सोपवण्याचे काम देतो. ओळख किंवा गरजू लोकांना हेरुन तो रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवतो. यामध्ये लातूर व इतर दुष्काळग्रस्त भागातील तरुणांना हेरले जाते. यामध्ये तो मोबाइलवर अर्ज भरल्याचा बहाणा करत अंगठ्याचा ठसा घेतो. ते केल्यास समोरच्या व्यक्तीच्या मोबाइलवर लगेचच ओटीपी येतो. तो क्रमांक मोबाइलमधील अर्जात टाकून अर्ज सबमिट केला जातो. एखाद्या दिवशी रेल्वेच्या रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी बोलावले जाते. तेथे पीडित व्यक्तीला डॉक्टरच्या केबिनबाहेर बसवले जाते. थोड्याच वेळात बाहेरुन एक व्यक्ती डॉक्टर असल्याचा बहाणा करत येतो. तो पीडिताचे ब्लड सॅम्पल घेऊन जातो. तसेच पैसे घेण्यासाठीही रेल्वे मुख्य कार्यालयाच्या आवारात बोलावले जाते. पैसे घेणारा व्यक्तीही पीडितासमोर मुख्य कार्यालय दरवाजातून बाहेर येतो. यामुळे विश्वास बसून पीडित सहज पैसे देतात.
पैशांसाठी फसला आणि आयुष्यातून उठला
विश्वजीत माने याची सांगलीत शेती आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी अजितने धान्य आयात-निर्यातीचा व्यवसाय करायचा म्हणून आमिष दाखवले होते. यासाठी मानेकडून 25 लाख रुपये घेतले होते. यानंतर तो एका गुन्ह्यात जेलमध्ये गेला. तेथून तो पुन्हा मानेला भेटला नाही.
दरम्यान, माने काही कामानिमित्त दिल्लीला गेल्यावर त्याला तेथे रेल्वेस्थानकावर खंडागळे सुटाबुटात दिसला. मानेने सुरुवातीला त्याला ओळखले नाही, मात्र खंडागळेने त्याला ओळख दाखवली. मानेने पैशांची विचारणा केल्यावर खंडागळेने त्याला “मी एक नवीन व्यवसाय केला आहे, तू त्यासाठी काम कर मी तुझे पैसे फेडतो’ असे आश्वासन दिले.
त्यानुसार माने महाराष्ट्रात परतल्यावर त्याला पीडितांना अपॉइंटमेंट लेटर देण्याचे काम दिले होते. मानेलाही या फसवणुकीच्या धंद्याची माहिती होती. मात्र, वसुलीच्या नादात तो खंडागळेच्या जाळ्यात अडकत गेला.