पुणे – भारतीय रेल्वे 2030 पर्यंत कार्बनमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी मध्य रेल्वेदेखील पुढाकार घेणार असून, लोणावळा ते खंडाळादरम्यानचा पट्टा “ग्रीन’ मार्ग होत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
लोणावळा स्थानकात सौरऊर्जेचा वापर होत आहे. याशिवाय, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासह विविध बाबींमध्ये “ग्रीन इनिशिएटीव्ह’ घेण्यासाठी सुरुवात केली आहे. केवळ स्थानकांवरील दिवेच नव्हे तर, सोलार पॅनेल, सोलर ट्री आणि सोलर कूलरदेखील बसवण्यात आले आहेत. हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असणारे खंडाळा, लोणावळा स्थानक येत्या काळात ग्रीन स्थानक म्हणून ओळखण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
लोणावळा रेल्वे स्थानकातील दोन प्लॅटफॉर्मवर सोलार पॅनल बसवले आहेत. यामुळे तयार होणाऱ्या ऊर्जेमुळे दरवर्षी सुमारे 5 लाख रुपयांची बचत होत आहे. यासह खंडाळा स्थानकादरम्यानच्या रेल्वे फाटक येथेदेखील सोलार पॅनल बसवले आहे.
यासह मध्य रेल्वेंतर्गत सीएसएमटी, चेंबुर, आसनगाव, पेण, रोहा आदी स्थानकांच्या परिसरात सोलर पॅनल, पवनचक्की बसवले आहे.