नवी दिल्ली – आरोग्य क्षेत्रात सरकारच्या प्रयत्नांना रेल्वे सर्व प्रकारे मदत करत असून, 600 गाड्यांचे मिळून 3 हजार 816 डबे आतापर्यंत कोविड केअर सेंटरमधे रूपांतरित करण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या डब्यांचा वापर कोविडची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना विलग ठेवण्यासाठी होऊ शकतो. राज्य सरकारांकडून मागणी होईल, त्याप्रमाणे हे डबे पाठवण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्रात नंदुरबार येथे 21 डबे आले असून, त्यात 47 रुग्ण दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ आणि हबीबगंज; तसेच उत्तर प्रदेशात वाराणसी, भदोही आणि फैजाबाद येथे, तर दिल्लीमधे आनंदविहार आणि शकूर बस्ती येथे असे डबे उपलब्ध आहेत.