रेल्वे मालगाडी रूळ सोडून मातीच्या ढिगाऱ्यावर

ओगलेवाडी येथील घटना सिग्नलबाबत गोंधळामुळे झाला अपघात 

ट्रेनचा ड्रायव्हर आणि स्टेशनवरील कर्मचारी यांच्यातील सिग्नलबाबत गोंधळ झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. सिग्नलबाबत गोंधळ उडाल्याने ट्रेन आपल्या तीन बोगींसह रेल्वे रूळ सोडून शेजारी काम सुरू असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये घुसली. अपघात झालेल्या ठिकाणी कोणीही कामगार नसल्यामुळे तसेच ट्रेनची गती कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.

कराड – कराड रेल्वेस्थानकानजीक पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी रूळ सोडून मातीच्या ढिगाऱ्यात आदळल्याने पुढील दुर्घटना टळली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकाराची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सविस्तर चौकशीअंतीच त्याबाबतची माहिती सांगता येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मिरज येथून आलेल्या क्रेनच्या मदतीने गाडी पुन्हा रूळावर आणण्यात आली.

पुण्याहून मिरजला जाणारी मालगाडी सकाळी साडेअकराच्या सुमारास कराड रेल्वे स्थानकाजवळ आली. त्यावेळी ती स्थानकाच्या बाजूला बंद असलेल्या रेल्वे मार्गावरून धावली. मालगाडीत 42 डबे होते. त्या डब्यातून युरिया खताच्या पोत्यांची वाहतूक केली जात होती. कराड रेल्वेस्थानकाजवळ सकाळी साडेअकराच्या 203-8-9 असा किलोमीटरचे ठिकाण दाखवणाऱ्या निशाणीजवळ घटना घडली. त्याआधी रेल्वे सिग्नल यंत्रणेने गाडीस पुढे न जाण्याचा सावधानतेचा इशारा दिला होता. तरीही गाडी बंद रेल्वे मार्गावरुन धावली.

मार्ग संपला असताना पुढे जमिनीवर पन्नास मीटरवर फरफटत जाऊन मार्गावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गाडीचे पुढील इंजिन आदळले. गाडीस दोन इंजिन असल्याने गाडीचे डबे रुळावरुन न घसरल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक झालेल्या विचित्र प्रकाराने खळबळ निर्माण झाली. दुपारी चारच्या दरम्यान मिरजेहून 140 टन वजनाची क्रेनसह अपघातराहत गाडी आणण्यात आली. इंजिनला जोडलेले डबे बाजूला करण्यात आले. घसरलेले पुढील इंजिन मार्गावर आणण्यात आले. घटनास्थळी दिवसभर लोकांनी मोठी गर्दी केली होती.

या अपघाताचा प्रवाशी गाड्यांच्या वाहतूकीवर फारसा परिणाम झाला नाही. या गाड्या फक्त नेहमीच्या वेळेपेक्षा उशिराने
धावत होत्या. घटना समजताच मिरजेचे वरिष्ठ अधिकारी लाड, रुपसिंग राठोड, कराडचे झार, स्थानक अधिक्षक सुग्रीव
मीना, सातारा आरपीएफ निरीक्षक अजय संसारे, रेल्वे उपनिरीक्षक सलीम खान, सहाय्यक उपनिरीक्षक विलासराव पाटील, हवालदार जी. टी. कांबळे, विपुल सुर्यवंशी, डी. व्ही. कुमार आदी दाखल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.