शेवगावात शहरासह तालुक्‍यात मटका अड्ड्यांवर धाडी

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मटका बुकीलाही घेतले ताब्यात

शेवगाव – अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने काल बुधवारी ( दि.24) शेवगाव शहरासह तालुक्‍यातील दादेगाव व मंगरूळ बुद्रुक येथे मटक्‍यावर टाकलेल्या धाडीमध्ये 10 जण ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे. त्यांच्याकडून 31 हजार 590 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एका प्रमुख मटका बुकीचाही समावेश आहे.

याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे मयुर दिपक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर दत्तू करवंदे, प्रविण भारस्कर व संतोष जगन्नाथ पानखडे हे पाथर्डी रोडवरील राजु इलेक्‍ट्रीकल्स दुकानाच्या आडोशाला मटक्‍याचे आकडे घेतांना आढळून आले. त्यांच्याकडून 14 हजार 80 रुपये जप्त करण्यात आले. यातील भारस्कर हा कारवाई करत असतांना फरार झाला.

शिवाजी चौकातील व्यवहारे एसटीडी बुथजवळ अमोल भाकरे, कुणाल इंगळे, पोपट बन्सी परदेशी व दिलीप आहुजा हे मटक्‍याचे आकडे घेत असतांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 13 हजार 50 रुपये जप्त करण्यात आले. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सागर अशोक ससाणे यांनी या आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे.

तालुक्‍यातील दादेगाव येथे एका टपरीत साजीद लतीफ सय्यद हा मटक्‍याचे आकडे घेतांना आढळुन आला. त्याच्याकडून एक हजार 910 रुपये हस्तगत करण्यात आले. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी अशोक ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे. तर चौथी कारवाई तालुक्‍यातील मंगरुळ बुद्रुक येथे झाली. येथील एका झाडाच्या आडोशाला मटक्‍याचे आकडे घेतांना रेवनाथ अंकुश विघ्ने, अमोल रामा केदार, भाऊसाहेब भागवत विघ्ने सापडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून दोन हजार 550 रुपये जप्त करण्यात आले. याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शहाजी आंधळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. सचिन अडबल, शिवाजी ढाकणे, रोहीत मिसाळ, कमलेश पाथरुड, मयुर गायकवाड, सागर ससाणे, रणजीत जाधव, चालक संभाजी कोतकर यांचे पथकाने केली.

अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा करणाऱ्या शेवगाव पोलिसांचे पितळ उघडे
अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने नगरहून येथे येवून गेल्या वर्षभरात मटका, जुगार, दारु, रस्तालुट, दरोडे आदी अवैध व्यवसायावर जवळपास 35 च्या वर छापे टाकुन वेळोवेळी गुन्हेगाराच्या मुसक्‍या आवळल्या. शेवगावात चालणारे अवैध व्यवसाय नगर येथील गुन्हे शाखेच्या लक्षात येतात पण शहरात व तालुक्‍यात जागोजागी दिवसाढवळ्या राजरोसपणे चालणारे हे उद्योग शेवगाव पोलिसांना दिसत नाहीत असे कसे म्हणता येईल? गुन्हे शाखेची ही कारवाई स्तुत्य असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रीया आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)