बावधनसह बारा वाड्यांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी

आ. मकरंद पाटील यांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासानागेवाडी धरणातून शेवटचे आवर्तन सोडले
वाई –
वाई तालुक्‍यातील नागेवाडी धरणात पाव टीएमसी पाणी साठवले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने वर्षभर पाणीपुरवठा करताना पाटबंधारे खात्याला तारेवरची कसरत करावी लागत असते. धरणाच्या कालव्यातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास उन्हाळ्यातील पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. दै. प्रभातने या संबंधी वारंवार वृत्त प्रसिद्ध करून आ. मकरंद पाटील यांना या संदर्भात लक्ष देण्यास भाग पाडले. आ. पाटील यांनी नागेवाडी पाटबंधारे खात्याला शेवटचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिल्याने बावधनसह बारा वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यामुळे बावधन परिसरातील शेतकऱ्यांनी दै. प्रभातला धन्यवाद दिले आहेत.

धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी कालव्यावर येवून आनंद व्यक्त केला. लिकेजमुळे धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. पाटबंधारे खात्याने योग्य नियोजन न केल्याने पाण्यात जे मत्स्यपालन केले जाते. ते योग्य पद्धतीने न केल्याने व पाणी वाहते नसल्याने पाण्याला दुर्गंधयुक्त वास येत आहे. तरीही पोटपाटाची कामे आजमितीला अपूर्णच आहेत. पोटपाटाची कामे पूर्ण झाल्यास संपूर्ण शेती ओलिता खाली येवू शकते. नागेवाडी धरणात होणारे मत्स्यपालन बंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत. धरणाची पाणी संकलन करण्याची क्षमता कमी असल्याने ना शेतीला पाणी ना देवू शकत या बारमाही वाहते ठेवू शकत अशी काहीशी अडचण नागेवाडी धरणाबाबत आहे. धरणाची उंची वाढवून धरण क्षेत्र वाढविण्यासाठी पाटबंधारे खात्याने प्रयत्न करावा अशी मागणी जोर धरत आहे.

बावधनसह बारा वाड्यातून हळद, उसाच्या पिकांबरोबर बागायती क्षेत्र बऱ्यापैकी असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. ती आता शेवटचे आवर्तन सोडल्याने बऱ्यापैकी मिटली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत पाटबंधारे खात्याला धन्यवाद दिले आहेत. शेवटचे आवर्तन न सोडल्यास गहू, उन्हाळ्यात घेण्यात येणारी भुईमूग, घास, व इतर बागायती पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे बारा वाड्यांचा शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर येवून पाणी टंचाईचा सामना करावा लागणार होता. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावत जनावरांचा सांभाळ करताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. असे विदारक चित्र सध्या बावधन सह बारा वाड्यात दुर्दैवाने दिसत आहे. नियोजन करून संपूर्ण गळती काढून पुढील हंगामात धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होवो व कालव्यात पाणी सुरळीत चालू राहो एवढीच अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.