हवाई दलाला भेडसावतोय शहरी पक्ष्यांचा प्रश्‍न

उपाय करावा तरी काय?; उत्तर शोधणे सुरू
गायत्री वाजपेयी
डॉ. सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजीच्या मदतीने सखोल अभ्यास आणि सर्वेक्षण
पुणे  – देशाच्या हवाई सीमांचे रक्षण करणाऱ्या हवाई दलाला शहरी पक्ष्यांचा प्रश्‍न सतावत असून, या समस्येवर उपाय तरी काय करावा, यावर उत्तर शोधणे सुरू आहे. गेल्या दशकभरात पक्ष्यांच्या धडकेमुळे (बर्ड स्ट्राइक) हवाई दलाचे तसेच नागरी उड्डाण सेवेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, यामध्ये प्रामुख्याने शहरी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे हवाई दल आणि पक्षी अभ्यासक संस्थांच्या पाहणीतून समोर आले आहे.

हवाई दलाच्या पक्षीशास्त्र विभाग (ऑर्निथोलॉजी डिपार्टमेंट) आणि डॉ. सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी यांनी देशातील काही निवडक धावपट्टींची पाहणी केली. यामध्ये अहमदाबाद, कोइंबतूर आणि कोन्नूर या विमानतळांचा समावेश आहे. या पाहणीत विमानांची धावपट्टी ही पाणथळ प्रदेशाच्या अतिशय जवळ असून, त्याठिकाणी गवताची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हे प्रदेश पक्ष्यांच्या रहिवासासाठी पसंतीचे प्रदेश बनले आहेत, असे दिसून आले. विमानांना धडक देणाऱ्या पक्षांमध्ये घारी, कबुतर, कावळा, वटवाघुळ, गिधाड आणि टिटवी अशा प्रामुख्याने शहरी भागात आढळणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

विशेष म्हणजे, या पक्ष्यांना धावपट्टीच्या परिसरातून हुसकावून लावण्यासाठी हवाई दलातर्फे जे उपाय अवलंबले जातात त्या उपायांचा फारसा परिणाम होत नसल्याने ही समस्या गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत हवाई सुरक्षा विभागाचे सह-संचालक विंग कमांडर एस. श्रीनिधी यांनी याबाबत माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. प्रमोद म्हणाले, “देशातील बहुतांश विमानतळांच्या धावपट्टी परिसरात उंच वाढलेले गवत असते. तर काही धावपट्टी या पाणथळाजवळ असतात. याव्यतिरिक्‍त या परिसरात टाकला जाणारा कचरा, गवताळ प्रदेशाचे नैसर्गिकदृष्ट्या अयोग्य व्यवस्थापन अशा विविध कारणांमुळे या परिसरात पक्षांच्या अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळेच सखोल अभ्यासबरोबरच योग्य धावपट्टी परिसरात योग्य व्यवस्थापनाची गरज असून, त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.’

गेल्या दशकभरात पक्ष्यांच्या धडकेमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण निश्‍चितच खालावले आहे. मात्र या विमान अपघातांमुळे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता, ही समस्या गंभीर आहे. एका विमान अपघातात हवाई दलाल किमान सात ते आठ कोंटींचे नुकसान झेलावे लागते. त्यामुळेच पक्ष्यांच्या धडकेबाबत गांभीर्याने विचार करून ते रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र बंदुकीचा वापर, मुखवटे व बुजगावण्याचा वापर, जाळ्यांचा वापर असे विविध पर्याय अवलंबले तरीही, पक्षी या उपयायोजनांना आत्मसात करतात. त्यामुळे हे उपाय प्रभावी ठरत नाहीत.’
– विंग कमांडर एस. श्रीनिधी, सह-संचालक, हवाई सुरक्षा विभाग.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.