रखडलेल्या तारळी प्रकल्पाचे प्रश्‍न मार्गी ; ग्रामस्थांच्या आंदोलनास यश

मायणी: धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, पळसगाव व परिसरामध्ये तारळीच्या प्रकल्पाचे काम गेली दहा वर्षे रखडले होते. परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर अखेर या पाण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या चार दिवसांमध्ये पाणी या गावांच्या शिवारात येणार आहे. यामुळे गावाचा शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

खटाव तालुक्‍याच्या पूर्व पश्‍चिम भागात असलेल्या धोंडेवाडी, सुर्याचीवाडी, पळसगाव, दातेवाडी, मायणीसह तारळी प्रकल्पातील पुनर्वसीत बोपोशी, पवारवाडी, कुशी, तोडोशी, मोरवाडी, पवनगाव आदी गावांच्या पिण्याच्या व शेती पाण्यासाठी तारळी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र गेल्या दहा वर्षांपासून विविध कारणांमुळे हा प्रकल्प रखडलेला होता.

26 जानेवारी रोजी धोंडेवाडी, सूर्याचीवाडी व पळसगाव येथील ग्रामस्थांनी रखडलेले काम पूर्ववत सुरू व्हावे, यासाठी धोंडेवाडीत रास्ता रोको केला. यावेळी तारळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दहा फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करतो, असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला.

या कार्यालयातून व प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालू नका, असे आवाहन करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचे असे आश्वासन दिले गेले. यानंतर 25 एप्रिल रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. हे काम आठ ते दहा दिवसांपासून रात्रंदिवस सुरू ठेवले. या कामादरम्यान संबंधित ठेकेदाराला धोंडेवाडी, सुर्याचीवाडी व पळसगाव येथील युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त मदत केली. त्यामुळे गेले दहा वर्षे रखडलेले काम दहा दिवसांत मार्गी लावण्यास मदत झाली. कामांमधील किरकोळ अडथळे एक ते दोन दिवसांत पूर्ण होतील व चार दिवसांच्या आत पाणी परिसरातील गावांच्या शिवारात खेळेल. या पाण्यामुळे परिसरातील शेती पाणी व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे.


तारळी प्रकल्पाचे पाणी धोंडेवाडी गावाच्या चारी भागात चार दिवसात येणार असल्याने बळीराजासह जनावरांचा व ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गावाच्या पूर्व भागात असलेला मोठा पाझर तलाव भरून घेण्यासाठी पुलाच्या दक्षिणेस मोठा दरवाजा मंजूर करून तलावात पाणी येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– हणमंत भोसले, उपसरपंच धोंडेवाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.