वाघोली (प्रतिनिधी) – संपुर्ण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यमध्ये व हवेली तालुक्यातील काही गावामध्ये ११ गुंठे सामुहिक खरेदीखताच्या नोंदी होत आहेत. परंतु फक्त पेरणे – वाडेबोल्हाई जि.प.गटामध्ये या नोंदी होत नव्हत्या त्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या वतीने जिल्हाधिकारी , हवेली प्रांत व हवेली तहसिलदार यांना पत्र देऊन त्या कामी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आलेली होती अन्यथा २१ डिसेंबर पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.
हवेली प्रांत अधिकारी संजय आसवले यांना याबाबत निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी लगेचच यामध्ये लक्ष घालुन ७ नोव्हेंबर रोजी तहसीलदार व मंडल अधिकारी यांना पत्र काढुन शासनाचा जी.आर. पाठवला व जिरायत २० गुंठे व बागायत १० गुंठे यांची खरेदीदस्ताची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याचे आदेश दिले आहेत.
हवेली तालुक्यात ११ किंवा त्यापेक्षा जास्त गुंठे क्षेत्राची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याची मागणी शिवसेना भाजपा अधिकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विपुल शितोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्याम गावडे, प्रल्हाद वारघडे, नवनाथ काकडे, लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, हवेली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली होती. दैनिक प्रभात ने देखिल या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल नागरिकांनी दैनिक प्रभातचे आभार मानले आहे.