पुणे – शहरात सर्वाधिक शिवकालीन तसेच पेशवेकालीन वाडे कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. यातील अनेक वाडे धोकादायक आणि पडण्याच्या मार्गावर असले, तरी महापालिकेत आणि राज्यात आघाडी सरकारच्या काळात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला. मात्र, राज्यात सत्ता मिळाल्यानंतर आणि महापालिकेतही विक्रमी मताधिक्य मिळवून भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर वाड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराची महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आपला सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षात वाडयांच्या पुनर्विकासाठी क्लस्टर डेव्हल्पमेंट पॉलिसी तयार करून महापालिकेकडून शासनाला पाठवण्यात आली असून, ती मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील वाडयांचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याची ग्वाही कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी दिली.
टिळक म्हणाल्या, शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये सर्वाधिक वाडे आहेत. प्रामुख्याने मुठा नदीच्या काठावर नारायणपेठ, सदाशिवपेठ, शनिवारपेठ तसेच कसबा गणपती, सोमवारपेठेचा काही भाग, बुधवारपेठ, रास्तापेठ परिसरांत 100 वर्षांहून अधिक जुने वाडे आहेत. ते पडण्याच्या अवस्थेत असतानाही याबाबत राजकीय अनास्था दाखवत महापालिकेतील आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र, महापालिकेत विरोधी पक्षात असतानाही वाड्यांच्या पुनर्वसनाबाबत आपण वारंवार सभागृहात आवाज उठवला. त्यानंतर राज्यात 2014, तर महापालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर या वाड्यांच्या पुनर्विकासाला खऱ्या अर्थाने गती आली. शासन आदेशानुसार, महापालिकेच्या माध्यमातून तातडीने वाड्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हल्पमेंट पॉलिसी तयार करण्यात आली आहे. ती शासनाकडून मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यातच, आता मतदारांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून आपल्याला संधी दिल्यास हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून त्या माध्यमातून शेकडो वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
हेरिटेज वाड्यांच्या संवर्धनावर भर
वाडे पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावतानाच, ज्या वाड्यांना शिवकालीन तसेच पेशवेकालीन म्हणून हेरिटेज म्हणून दर्जा मिळाला आहे. या वाड्यांच्या संवर्धनासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. गुजरातमध्ये अशा ऐतिहासिक वारशाच्या वाड्यांना तेथील राज्य शासन संवर्धनासाठी विशेष अनुदान देते. त्याच धर्तीवर पुण्यातील वाड्यांसाठीही आपला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी आपण स्वत: गुजरातमध्ये अशा वाड्यांची तसेच संवर्धनाची पाहणी केली असून त्याच धर्तीवर पुण्यासह राज्यातील इतर वाड्यांसाठीही असे एकत्रित धोरण करण्याचा आपला मानस असल्याचेही टिळक म्हणाल्या.