नीरेच्या शाळेचा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीतच

नीरा – नीरा (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तात्पुरत्या इमारतीच्या जागेचा प्रश्‍न अजूनही अनुत्तरितच आहे. प्रशासनाने पाहणी केल्यानंतर प्रश्‍न लवकर मिटण्याची आश्‍वासन दिल्यानंतर पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली. तात्पुरत्या शेडसाठी जागा देण्याचे दोन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे देण्यात आले आहेत.

नीरा येथील प्राथमिक शाळेच्या प्रस्तावित तात्पुरत्या शेडसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत यासाठी येथील पालकांनी मुले शाळेत न पाठवता बेमुदत शाळा बंद अंदोलन पुकारले होते. यानंतर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, पंचायत समिती सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी कन्या शाळेत शेजारील लक्ष्मण चव्हाण व राजेश चव्हाण यांच्या मालकीच्या असलेल्या दोन जागा व सुदाम बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांची तक्रारवाडीच्या मार्गालगत असलेली मोकळी जागा पाहण्यात आली होती. यापैकी सुदाम बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांची असलेली जागा काही तांत्रिक अडचणीमुळे देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर लक्ष्मण चव्हाण यांनी आपल्या जागेचा अडीच वर्षांसाठी वापरण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला या संदर्भात संमतीपत्र त्यांनी दिले आहे. यानंतर नीरेचे माजी उपसरपंच कल्याण जेधे यांनीही आपल्या मोकळ्या जागेत शाळेच्या तात्पुरत्या खोल्यांचे बांधकाम केले जावे म्हणून तशा प्रकारचे संमती पत्र तयार करून पंचायत समितीकडे सुपूर्त केले आहे. यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांनीही शाळेला भेट देत शाळेचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, अशी हमी दिली.

दरम्यान, पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी या शाळेचा प्रश्‍न दि. 15 ऑगस्ट पर्यंत मार्गे लावून रयतच्या संकुलात तात्पुरत्या खोल्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनीही शाळेसाठी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या एका प्रक्रिया संस्थेची इमारत उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

जिल्हा परिषदेकडे दोन खासगी जागांचे प्रस्ताव आले असले तरी जिल्हा परिषद प्रशासन रयत संकुलातील जागा मिळवण्यास प्राधान्य देत आहे. कारण, या परिसरात शाळा भरवणे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे.
– सुनील कुऱ्हाडे, जिल्हा शिक्षण अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.