पुणे विभागातील वरिष्ठ अनुदानित; महाविद्यालयातील प्राध्यापकांना लाभ
पुणे – पुणे विभागातील 44 वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या सहायक प्राध्यापकांचे मानधनाचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे संबंधित प्राध्यापकांना महाविद्यालयामार्फत मानधन त्वरित अदा करावे लागणार आहे.
वरिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयांच्या पूर्णवेळ व कायमस्वरूपी सहायक प्राध्यापकांची बहुसंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरती व्यवस्था म्हणून तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापक नियुक्ती करण्याचा धडाका महाविद्यालयांनी लावला आहे. या सहायक प्राध्यापकांना अनेक वर्षे तुटपुंजे मानधन मिळत होते. मात्र, गेल्या वर्षांपासून त्यात वाढ केली. त्यासाठी अटी व शर्तीही लागू केल्या आहेत.
यांचे पालन करणाऱ्या महाविद्यालयांनाच तासिका तत्त्वावरील सहायक प्राध्यापकांच्या मानधनासाठी पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून अनुदान वाटप करण्यात येत असते. जून 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत संबंधित प्राध्यापक ज्या दिवशी कामावर रुजू झाले आहेत त्या दिवसापासूनचे मानधन त्यांना देण्यात येणार आहे. महाविद्यालयाकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.
प्रस्तावांची तपासणी करून महाविद्यालय आणि व्यक्तीनिहाय अनुदान मंजूर केल्याचे आदेश पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी जारी केले आहेत. एका सिद्धांतिक तासिकेसाठी 417 रुपये व एका प्रात्यक्षिक तासिकेसाठी 117 रुपये याप्रमाणे मानधन मंजूर झाले आहे. एका महिन्यासाठी 36 तासिकांचेच मानधन मंजूर केले आहे. ज्या बाबीसाठी रक्कम मंजूर केली आहे त्याच बाबीवर खर्च करण्यात यावी. इतर कोणत्याही बाबींवर रक्कम खर्च करण्यात येऊ नये.
प्रचलित नियम लक्षात घेऊन आयकर कपातीविषयक योग्य ती कारवाई करण्यात यावी. एकदा रक्कम अदा केल्यानंतर संबंधीत कर्मचाऱ्यांना पुन्हा रक्कम अदा करण्यात येऊ नये. मंजूर करण्यात आलेले अनुदान हे सशर्त अनुदान आहे, असे आदेशही प्राचार्यांना बजाविण्यात आलेले आहेत.