पेशावरमधील्‌ राज कपूर यांच्या हवेलीपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न

पेशावर – हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर खानदानाच्या मालकीची पेशावर येथील आलिशान हवेलीपुढे आता अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. या हवेलीच्या जागेवर आता व्यवसायिक संकुल उभे करण्याचा विचार सध्याच्या मालकाने निश्‍चित केला आहे. ते या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शो मॅन राज कपूर यांचे जन्मस्थळ असलेले आणि ऋषी कपूर यांच्या पूर्वजांची ही हवेली आता लवकरच जमिनदोस्त होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

खैबर पख्तुनवा प्रांतातील पेशावरमधील कपूर हवेलीला किस्सा ख्वानी बजार’ला एका संग्रहालयामध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने 2018 मध्ये घेतला होता. अभिनेते ऋषी कपूर यांनीच तशी विनंती पाकिस्तान सरकारला तेंव्हा केली होती. त्यानुसार पाकिस्तान सरकार हे घर संग्रहालयात रूपांतर करेल असे आश्वासन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ऋषी कपूर यांना दिले होते.

मात्र ही हवेलीची अवस्था म्हणजे एखाद्या भूत बंगल्यासारखी भयानक झाली आहे, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. अतिशय जीर्ण झालेली ही वास्तू केंव्हाही कोसळेल, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. पाऊस, सोसाट्याचे वारे, वादळ आणि गेल्या काही वर्षात बसलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍यांमुळे वास्तूला उतरती कळा लागली आहे.

ही हवेली सध्या शहरातील एक श्रीमंत ज्वेलर हाजी मुहम्मद इसरार यांच्या मालकीची आहे. हवेलीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ही वास्तू खरेदी करून आणि पर्यटकांसाठी या वास्तूचे संवर्धन करण्याची प्रांतीय सरकारला इच्छा आहे.

मात्र इसरार यांना मात्र ती इमारत पाडून तेथे नवीन व्यावसायिक इमारत बांधायची आहे. यापूर्वी त्यांनी इमारत पाडण्यासाठी तीन-चार प्रयत्न केले होते. परंतु खैबर पख्तूनख्वाच्या वारसा विभागाने त्यांच्यावर “एफआयआर’ नोंदवल्यामुळे हे प्रयत्न विफल ठरले. या इमारतीचे संग्रहालय करण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. जर सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर ही इमारत आपोआपच पडेल, अशी नागरिकांना भीती वाटते आहे.

कपूर खानदानाचा वारसा…
“कपूर हवेली’ पृथ्वीराज कपूर यांचे वडील बाशेश्वरनाथ कपूर यांनी बनवली होती. मूळचे पाकिस्तानमधील पेशावर येथील रहिवासी असलेले कपूर कुटुंब 1947 मध्ये फाळणीनंतर भारतात स्थलांतरित झाले. आजोबा पृथ्वीराज आणि वडील राज कपूर यांचा जन्म जिथे झाला त्या वडिलोपार्जित घराला 1990 मध्ये ऋषी कपूर आणि त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी भेट दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.