जनावरांचा पाणीप्रश्‍न बनला गंभीर

– संतोष वळसे पाटील

सध्या पाऊस लांबल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्याने माणसांसह जनावरांचा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. मेंढपाळ मेंढ्यांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी रानावनात, डोंगराळ भागात फिरताना दिसून येत आहेत.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस काही प्रमाणात झाला होता. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात बहुतांशी ठिकाणी नुकसानही झाले होते, परंतु पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला होता. पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बहुतांश ठिकाणी जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्यामुळे मेंढपाळ आपल्या मेंढरांसह चाऱ्याच्या शोधात रानावनात फिरताना दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हिरवा चारा सध्या दुर्मिळ झाला आहे. गेल्या चार ते पाच पिढ्यांपासून पारनेर तालुक्‍यातील धनगरबांधव आपल्या मेंढ्यांच्या वाड्यासह तालुक्‍यात स्थायिक झाले आहेत. मेंढ्यांना चारा शोधण्यासाठी त्यांना रानावनात भटकावे लागत आहे. तसेच मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी रोजच पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. वळवाच्या पावसाने हुलकावणी दिली तर मौसमी पावसाने चालढकल केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. घोडनदी आणि ओढ्या-नाल्यांना पाणी नसल्याने विहिरींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.

पाऊस केव्हा होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. खरीप हंगामाची शेतकऱ्यांनी तयारी केली असून बी भरणा, शेत नांगरणी आणि कोंबडखत शेणखत इत्यादी खतांचे ढिग शेतामध्ये लावले आहेत. पाऊस केव्हा होईल यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून राहिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)