माण आणि खटाव तालुक्‍यांतील 64 गावांचा प्रश्न मिटणार

सातारा  – माण आणि खटाव तालुक्‍यांतील 64 वंचित गावांना जिहे कठापूर उपसा सिंचन आणि टेंभू योजनेचे पाणी देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नांमुळे आज मुंबईमध्ये मुख्य सचिव आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत विविध आदेश दिल्याने माण आणि खटाव तालुक्‍यातील 64 गावे ओलिताखालील येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, मुख्य सचिव चहल, भाजप नेते महेश शिंदे, प्रकल्प सचिव घाणेकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, मंत्रालयाचे उपसचिव आणि दोन्ही पाणी योजनांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील धरणांमधून येणारे मोठ्या प्रमाणावरील पाणी विविध योजनांद्वारे इतर जिल्ह्यांना देण्यात येते. मात्र, जिल्ह्यातीलच माण आणि खटाव या कायम दुष्काळी तालुक्‍यांवर अन्याय केला जातो.

या अन्यायाविरोधात आमदार गोरेंनी नेहमीच आवाज उठवला होता. “अगोदर या दोन तालुक्‍यांची तहान भागवा आणि पाणी न्यायचे तिकडे न्या,’ असे त्यांनी अधिवेशनात सांगितले होते. जिहे कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील 32 गावांना देण्याची मागणी आमदार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. खटाव तालुक्‍यातील मायणीसह 16 आणि माणमधील कुकुडवाडसह 16 अशा 32 गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरु ठेवला होता.

अगदी पाणी मिळाले नाही तर उद्रेक होवून टेंभूचा कॅनॉल फोडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अधिवेशनातही त्यांनी त्याबाबत भूमिका मांडली होती. जिहे कठापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्‍यातून माण तालुक्‍यातील आंधळी धरणात येणार आहे. या योजनेद्वारे माणगंगा नदी प्रवाहीत करण्याचे प्रयोजन आहे. मात्र, माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील 32 गावांना कोणत्याच योजनेचे पाणी मिळणार नाही, हे ध्यानात घेऊन आमदार गोरेंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.

या गावांना पाणी मिळण्यासाठी आंधळी धरणातून पाणी उचलून 32 गावांना देण्याची योजना त्यांनी सादर केली. कृष्णा खोरे महामंडळ सिंचन भवन येथून जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना त्याप्रमाणे अहवाल सादर करण्यात आला होता. गेल्याच आठवड्यात आंधळी धरण परिसरात या कामाच्या सर्वेक्षण आणि अन्वेक्षणाचे काम सुरुही करण्यात आले आहे.

टेंभू योजनेचे पाणी खटाव आणि माण तालुक्‍यातील 32 गावांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आजच्या बैठकीत त्यांनी 22.5 टीएमसी पाण्याला धक्का न लावता अतिरिक्त अडीच टीएमसी पाणी 32 गावांना देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी जलआयोगाची मान्यता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिहे कठापूर आणि टेंभू योजनेचे पाणी माण आणि खटाव तालुक्‍यातील 64 गावांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर दोन बैठका झाल्या होत्या. मात्र निर्णय होइपर्यंत गोरेंनी याबाबत कुठेच वाच्यता केली नव्हती. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या कामासाठी मोलाची मदत केली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही सुरुवातीपासूनच गोरेंच्या पाठपुराव्याला सहकार्य केले.

आदर्की ते आंदरुड दरम्यान आठ महिने पाणी
फलटण -वर्षा बंगल्यावरील याच बैठकीत नीरा देवघर धरणातील पाणी गावडेवाडी तालुका खंडाळा येथून लिफ्ट करून धोम बलकवडी कॅनॉलमध्ये सोडून आदर्की ते आंदरुड या पट्ट्यातील शेतकऱ्यांना 8 महिने पाणी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन योजना पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना 4 महिने मिळणारे पाणी आता 8 महिने मिळणार आहे. तसेच निरा देवघर धरणातील उजव्या कालव्यात पाणी वाढल्याने निरादेवघरचे कालवे पूर्ण होईपर्यंत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लिफ्टच्या परवानग्या 8 दिवसांत देण्याबाबत मंत्र्यांनी सूचना केल्या. नीरा देवधरचे कालवे पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. यासाठी बळीराजा योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे.

माण- खटावसाठी ऐतिहासिक निर्णय
माझ्या आमदारकीच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये उरमोडीचे पाणी माण आणि खटाव तालुक्‍यात आणून 40 टक्के भाग टंचाईमुक्त करण्यात मला यश आले होते. तो क्षण आमच्यासाठी ऐतिहासिकच होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासाठी दुसरा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही तालुक्‍यांतील 64 गावे ओलिताखाली येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. उत्तर माणमधील 32 गावे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांची तहान आता भागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना सचिवांना दिल्या, अशी माहिती जयकुमार गोरे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.